… तर भाजप पदाधिका-यांसाठी पालिकेत स्वतंत्र बेडची व्यवस्था करा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/download-2.jpg)
- विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची आयुक्तांकडे उपरोधिक मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असतानाही आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापाैर आणि स्थायी समिती सभापतीचे कार्यालयाचे विस्तारीकरण कसे काय करण्यात आले, त्या खर्चाला मंजूरी कधी दिली, तसेच त्याच्या कार्यालयात स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था केली. परंतू, विरोधी पक्षनेत्यांचे कार्यालयाचे विस्तारीकरण करण्याची मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आयुक्त हे पक्षपातीपणा करीत असून त्या पदाधिका-यांसाठी पालिकेत स्वतंत्र बेडची देखील व्यवस्था करा, अशी उपरोधिक मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ नंतर महापालिकेत भाजप पक्षाची सत्ता आली, व महापालिकेच्या इतिहासामध्ये सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अस्तित्वात आला. त्यावेळच्या तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी विरोधी पक्षाचे ३८ नगरसदस्य असल्यामुळे विरोधी पक्षाचे कार्यालय मोठे मिळावे अथवा त्याचा विस्तार करण्यात यावा म्हणून अर्ज विनंत्या व शेवटी आंदोलने केली परंतु सत्ताधारी भाजप पक्षाच्या पदाधिका-यांनी व प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. आताही विरोधी पक्षाचे कार्यालय आहे त्याच जागेत असून तिथे सर्व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांच्या नगरसदस्यांना बसण्याची अडचण होत आहे.
नुकतेच लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळातच मा. महापौर व स्थायी समिती सभापती कार्यालयाचे विस्तारीकरणाचे काम चालू करण्यात आले. सदरचे काम आचारसंहितेमध्ये कसे काय चालू करण्यात आले ? याला मंजुरी कधी देण्यात आली ? या संबधीची सविस्तर माहिती देण्यात यावी. तसेच भाजप पदाधिका-यांच्या बहुतेक कार्यालयामध्ये स्वतंत्र्य बाथरुम, टॉयलेट व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपणांस अजून एक विनंती आहे की, आता भाजप पदाधिका-यांच्या कार्यालयावर एवढा खर्च केलाच आहे तर अजून थोडा खर्च करुन या कार्यालयाच्या अँटी चेंबरमध्ये स्वतंत्र्य बेडचीही व्यवस्था करण्यात यावी. कारण भाजपचे पदाधिकारी सकाळी १० पासून रात्री १० पर्यंत काम करीत असतात त्यामुळे येथेच त्यांना विश्रांतीही घेता येईल. आपण जर बेडची व्यवस्था करणार नसाल तर मी स्व:त बेडची व्यवस्था करण्यास तयार आहे. असेही त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.