झोपडपट्टी नागरिकांचा अ प्रभाग कार्यालयास घेराव
पिंपरी – दुर्गानगरमधील रस्त्यात येणा-या आणि अनधिकृत झोपड्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आज (मंगळवारी) कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ नागरिकांनी महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालयाला तब्बल चार तास घेराव घातला. दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत चार तास प्रभाग कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. नागरिकांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयातच रोखून धरले होते.
महापालिकेने दुर्गानगर येथील रस्त्यात येणा-या आणि अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली. या कारवाईमुळे संतापलेल्या नागरिकांनी थेट अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा नेला. तेथे कार्यालयाला घेराव घालण्यात आला. दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चार तास घेराव सुरू होता. यासंदर्भात कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी म्हणाले की, अनधिकृत झोपडपट्ट्यांवर नियमानुसार ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी प्रभाग कार्यालयाला घेराव घातला होता. मात्र, पालिकेने कारवाई रितसर पूर्ण केली आहे.