breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
जिजामाता रुग्णालयात कर्मचा-यांचा निष्काळजीपणा, जैविक कच-याकडे दुर्लक्ष
पिंपरी ( महा ई न्यूज ) – जिजामाता रुग्णालयात रुग्णांना अद्यापही व्हरांड्यातच सलाईन लावली जात आहे. सलाईन लावल्यानंतर सलाईनच्या बाटलीची विल्हेवाट देखील लावली जात नाही. तसेच रुग्णालयाच्या एका कोपर्यात औषधांच्या बाटल्यांचा खच पडला आहे. रुग्णालयीन प्रशासनाचा गलथान कारभार सुधारता सुधारेना झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयांची बिकट अवस्था आहे. गैरसुविधा आणि निष्काळजीपणाने वावरणारे कर्मचारी यामुळे रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जिजामाता रुग्णालयाच्या देखील गैरसुविधा थांबता थांबेना झाले आहे. रुग्णांची गैरसुविधा थांबविण्यासाठी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. सुमारे दोन वर्षांपासून हे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे सध्या रुग्णालयाचे स्थलांतर जवळच्याच कमला नेहरु महापालिकेच्या शाळेजवळ करण्यात आले आहे. जिजामाता रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग व प्रसूती विभाग आहे. दिवसाला 150 ते 200 रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. याठिकाणी सध्या 6 खाटाच उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होताना दिसते.
जिजामाता रुग्णालयाच्या व्हरांड्यातच बुधवारी (दि.27) रुग्णाला सलाईन लावण्यात आली. सलाईन झाल्यानंतर सलाईनच्या बाटलीची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. मात्र रुग्णालयातील कर्मचारी तशीच बाटली ठेवत आहेत. रुग्णालयाच्या कोपर्यात औषधांच्या बाटल्या पडल्या आहेत. या बाटल्यांचा खच पडला असून त्याची देखील विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे या ठिकाणी घाण साचली असून डासांची निर्मिती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. यावर ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरूमणी यांनी बोलण्यास नकार दिला.