जादूटोणा करणाऱ्या एकाला चिखली पोलिसांकडून अटक
![Jadutona Karanlya Ekala Chikhali Polisankadun Stuck](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/jadu.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
जादूटोणा करनाऱ्या एकाला चिखली पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पोलिस शिपाई संतोष बाबूलाल बांगर यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी हे रविवारी (ता.७) पहाटे साडेतीनच्या सुमारास कुदळवाडीतील एचपी पेट्रोल पंपाशेजारी मेन रोडवर गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी एक गाठोडे घेऊन संशयास्पद अवस्थेत जाताना दिसला. पोलिसांनी त्याला हटकले असता, तो पळून जाऊ लागला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली व गाठोड्याची तपासणी केली असता, त्यामध्ये जादूटोणा करण्यासाठी लागणारे साहित्य व एक चाकू आढळला.
त्याबाबत त्याला विचारल्यावर त्याने सांगितले, की हे साहित्य मी पूजा करण्यासाठी गोविंद मोरे यांच्या घरी घेऊन चाललो आहे. त्यावरून गोविंद मोरे यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, की गौतम मोरे हा जादूटोणा करण्यासाठी पूजाअर्चा करतो. ‘तुमच्या घरी पूजा केली, तर तुमची प्रगती होईल’, असे गौतम याने मला सांगितल्याचे गोविंद मोरे यांनी पोलिसांना सांगितले.
यावरून गौतम मोरे यांच्यावर महाराष्ट्र नरबळी अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंधक घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.