च-होलीतील मजूर दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणी ठेकेदाराला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/0suicide_100.jpg)
पिंपरी – ठेकेदारांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २८ जून रोजी चऱ्होली येथे घडली. आत्महत्या पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार पोलिसांनी ठेकेदाराला अटक केली आहे.
भरत हनुमान काळे (वय २९, रा. दाभाडे वस्ती चऱ्होली) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. मुक्ता उत्तम सूर्यवंशी (वय ३१) आणि उत्तम तुकाराम सूर्यवंशी (वय ३३) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नावे आहेत. दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम सूर्यवंशी हे आरोपी भरत काळे यांच्याकडे कामाला होते. काळे यांनी त्यांच्या मजुरीचे पैसे न दिल्याने त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. तसेच आरोपी काळे याने केबलचे बंडल चोरल्याबाबत सुर्यवंशी यांनी मुख्य ठेकेदारास सांगितले होते. या कारणावरून देखील त्या दोघांमध्ये भांडण झाले होते. तसेच आरोपी काळे हा मुक्ता सूर्यवंशी यांना देखील त्रास देत होता. या सर्व त्रासाला कंटाळून सूर्यवंशी दाम्पत्याने २८ जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.