चिखलीत सोमवारी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/7-7.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् फाउंडेशन व महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशन यांच्या वतीने सर्व जातीधर्मीय सामुदायिक अविस्मरणीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मा. महापौर राहुल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सामुदायिक विवाह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट, माजी मंत्री राम शिंदे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा (माई) ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, माजी महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच प.पू गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या उपस्थित राहणार आहेत.
चिखलीतील, जाधववाडी येथील रामायण मैदानात पारंपरिक रितीरिवाजानुसार सामुदायिक विवाह सोहळा सोमवार दि. 16 मार्च 2020 रोजी सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी होणार आहे. सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून समाजातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांना लग्नासारखे शुभकार्य पार पाडण्यासाठी कर्जाच्या ओझ्याखाली जावे लागते. त्यांना मदत व्हावी व आपल्या हातून सामाजिक संवेदना जपत मा. महापौर राहुल जाधव यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व जातीधर्मीय 55 जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी ही वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून महाराष्ट्राच्या विविध भागातील गोरगरीब, मध्यम वर्गीय लोकांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
दरम्यान, या विवाह सोहळ्याचे 3 रे वर्ष आहे. पहिल्या वर्षी 22, तर गेल्या वर्षी 55 विवाह या सोहळ्यात लावण्यात आले आहेत. या विवाह सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुल्क वधूवरांकडून घेतले जात नाहीत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. या सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून आपणही सामाजिक कार्यात सहभागी व्हावे तसेच वधु-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत, असे आवाहन आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् फाउंडेशन व महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.