चालकाने त्यांच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा केला प्रयत्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/1Traffic_Police_0.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
विनामास्क चाललेल्या मोटारचालकाला कारवाईसाठी पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिस बोनेटवर असतानाही चालकाने मोटार न थांबविता तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत मोटार दामटली. दरम्यान, वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान राखत मोटारीच्या बोनेटला पकडले. अखेर धावत्या मोटारीसमोर नागरिकांनी गाड्या आडव्या घातल्यानंतर त्याने मोटार थांबविली. हा प्रकार चिंचवड येथे घडला.
आबासाहेब सावंत असे वाहतूक कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर युवराज किसन अनवते (वय 50, रा. विशालनगर, पिंपळे निलख) आरोपी असे मोटारचालकाचे नाव आहे. सावंत हे चिंचवड वाहतूक विभागात कार्यरत असून गुरूवारी (दि. 5) सायंकाळी पाचच्या सुमारास ते अहिंसा चौकात कर्तव्यावर होते. त्यावेळी अनवते विनामास्क असल्याने सावंत यांनी थांबण्याचा इशारा केला असता तो पुढे जाऊन थांबला. दरम्यान, मास्क लावला नसल्याने पावती करा, असे सांगण्यासाठी सावंत त्याच्याजवळ गेले असता तो मोटार पुढे-पुढे घेत होता. सावंत मोटारीसमोर गेले असता त्याने मोटारीचा वेग वाढविला. सावंत यांच्या पायाला धडक दिल्याने ते मोटारीच्या बोनेटवर पडले.
त्यानंतरही त्याने मोटार न थांबविता वेगात मोटार दामटली. वारंवार विनंती करूनही मोटार थांबविली नाही. यावेळी प्रसंगावधान राखत सावंत यांनी मोटारीच्या बोनेटला पकडले होते. दरम्यान, बाजूने जाणाऱ्या इतर दुचाकीचालकांनी गाड्या आडव्या लावण्यासह समोरील मोटारचालकालाही मोटार थांबविण्यास सांगितल्याने अनवते याने अखेर त्याची मोटार थांबविली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलिसांनी अनवते याला ताब्यात घेतले आहे.