चाकण : थोपटवाडीतील अल्पवयीन मुलीच्या हत्तेचा युध्द पातळीवर तपास करा – प्रविण दरेकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/IMG-20200726-WA0007.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
चाकण येथील खेड तालुक्यात मुलीला विवस्त्र करून तिची हत्त्या करण्यात आली. आरोपींचा मुलीच्या कुटुंबियांवर दबाव वाढत असल्याचे लक्षात आले. कायद्याचं राज्य असताना मुलीच्या कुटुंबियांना घाबरण्याची कसलीही गरज नाही. या प्रकरणाचा युध्द पातळीवर तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी. असे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्तांना दिले आहेत, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
चाकण येथील खेड तालुक्यात थोपटवाडी गावात आरती कलवडे या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. या तरुणीच्या घरी राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर दरेकर यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात भेट देऊन अतिरिक्त पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी आमदार बाळा भेगडे, पक्षनेते नामदेव ढाके, भाजपच्या नेत्या उमा खापरे आदी यावेळी उपस्थित होते.
दरेकर म्हणाले की, मुलीच्या कुटुंबियांना मुलगी गेल्याचं दुःख आहेच, पण आरोपींच्या नातेवाईकांची जास्त भीती वाटू लागली आहे. त्यांच्यावर दबाव वाढत असल्याचे बोलण्यातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ या घटनेचा तपास करावा. गावातील ज्या कोणी मोठ्या व्यक्ती आहेत, त्यांना तत्काळ ताब्यात घ्यावे. पोलीस पाटलांना ताब्यात घेऊन माहिती घ्यावी. शक्य तेवढ्या लवकर मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. देशात कायद्याचं राज्य असताना अशा घटनेतील आरोपींना वेळीच शिक्षा झाल्यास पुन्हा असे कृत्य करणा-यांना जरब बसेल, असेही दरेकर यावेळी म्हणाले.