घरासाठी अर्ज करण्याकरिता प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
4 हजार 883 सदनिकांसाठी मागविले अर्ज
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणच्या वतीने मोशीतील पेठ क्रमांक 12 येथे एकूण 4 हजार 883 सदनिकांच्या गृहप्रकल्पांसाठी शुक्रवारी (दि. 27) ऑनलाइनद्वारे अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. गृहप्रकल्पामध्ये सदनिकांची अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये विभागणी केली आहे, अशी माहिती नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.
गृहप्रकल्पामध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि दिव्यांग अशी वर्गवारी करण्यात आली आहे. इडब्लूएस घटकामध्ये 3 हजार 317 व एलआयजी घटकात 1 हजार 566 सदनिका होणार असून प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर घरासाठी अर्ज भरता येतील. अर्ज आणि अनामत रक्कम ऑनलाइन, एनईएफटी व आरटीजीएसद्वारे भरण्याची अंतिम तारीख 30 मार्च आहे. 16 एप्रिलला ऑनलाइन सोडत होणार आहे.