breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ग्रामपंचायत निवडणूक : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच ‘दादा’

पुणे  । प्रतिनिधी

गावविकासाचा प्रारंभ जेथून होतो तेथील एकूण 747 ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. यातील बिनविरोध वगळता इतर 649 ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले. यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंगेसने वर्चस्व राखले आहे. जवळपास पाचशे ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा पक्षातील वरिष्ठांनी केला आहे. याखालोखाल जिल्ह्याच्या उत्तर पट्ट्यात साथ मिळाल्याने शिवसेनेला बऱ्यापैकी ग्रामपंचायती ताब्यात आल्यात. तर शिरूर आणि दौंड तालुक्‍यात भाजपने चांगली लढत दिली.

भोर, पुरंदर या तालुक्‍यात पक्षाचे आमदार असल्याने येथील काही ग्रामपंचायती कॉंग्रेसकडे गेल्या आहेत.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी महाविकास आघाडीची हाक दिली गेली. त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, स्थानिक आघाड्या यावेळी पाहायला मिळाल्या. ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्याने निकालाचीही तेवढीच उत्सुकता लागली होती. त्याप्रमाणे सोमवारी सकाळपासूनच मतमोजणीच्या ठिाकणी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळली.

सुरुवातीचे निकाल अत्यंत धक्कादायक पाहायला मिळाले. जसजशा फेऱ्या पुढे जातील तशी उत्कंठा अधिकच वाढली होती. निकालानंतर ही निवडणूक तरुणाईच्या हातात गेल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के देत नवखे चेहरे निवडून आले. काही ठिकाणी पारंपरिक लढत झाली तर काही ग्रामपंचायती पक्षीय पाठिंब्यावर लढल्या गेल्या.

जुन्नर तालुक्‍यात शिवसेना व राष्ट्रवादीकडे अनेक ग्रामपंचायती गेल्या आहेत. येथे मनसेनेही एका ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला. आंबेगाव तालुक्‍यात सेना-राष्ट्रवादीला समसमान म्हणजेच 15 व 16 ग्रामपंचायती ताब्यात आल्या. तर खेड तालुक्‍यात शिवसेनेचा करिष्मा अद्यापही असल्याचे जाणवले. येथे राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेचेही तितक्‍याच ग्रामपंचायतींवर सत्ता आली आहे. चाकण औद्योगिक पट्ट्यात भाजपची सरशी झाली.

शिरूर तालुक्‍यात आमदार अशोक पवार यांच्याच वडगाव रासाई या गावात भाजपने धक्का देत ग्रामपंचायत ताब्यात घेतली. यासह इतरही ग्रामपंचायतींमध्ये चांगली लढत दिली. शिक्रापूरसारख्या मोठ्या गावात बडे नेते असलेल्या पै. मंगलदास बांदल यांच्या गटाचा पराभव झाला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपट शेलार यांच्या पत्नीला पराभवाला सामोरे जावे लागले. मुळशी तालुक्‍यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला संमिश्र यश मिळाल्याचे दिसले. तर भाजपनेही का जागांवर विजलय मिळवला.

पुरंदर तालुक्‍यातील 55 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षनिहाय संमिश्र यश मिळाले तरी शिवसेनेने आघाडी घेतली आहे. भाजपला दोन जागांवरच समाधान मानावे लागले. शिवसेनेने दोन अंकी आकडा पार करीत कॉंग्रेस- राष्ट्रवादीला काहीअंशी चितपट केले आहे. शिवसेनेचे हे लख्ख यश इतर पक्षांतील वरिष्ठ नेत्यांना आत्मचिंतन करायला भाग पाडले आहे. वेल्हे तालुक्‍यातील 20 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. यात गावपातळीवरील स्थानिक गटांनी बाजी मारली आहे. यापूर्वी 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.

बारामती तालुक्‍यात 49 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीच्या गावपातळीवरील गटांना यश मिळाले. यात दिग्गज नेत्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे. माळेगाव, सांगवीत सत्तांतर घडले आहे. दौंड तालुक्‍यात माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाची सरशी झाली आहे. तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. यवतमध्ये राष्ट्रवादीने हॅट्ट्रिक केली आहे. भोर तालुक्‍यातील 63 ग्रामंचायतींच्या निवडणुकीत 38 गावांत कॉंग्रेसच्या विचारांची सत्ता आली आहे. तर बिनविरोध झालेल्या 8 ग्रामपंचायती या कॉंग्रेस विचारधारेच्या आहेत. हवेली तालुक्‍यातील 54 ग्रामपंचायतींपैकी 45 ग्रामपंचायतींचा निकाल स्थानिक पातळीवर पॅनल आणि आघाड्याकडे झुकला आहे. हवेलीतील 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.

मावळमध्ये विजयाचे दावे-प्रतिदावे

मावळ तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. निवडणूक झालेल्या 49 ग्रामपंचायतीपैकी 40 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी पॅनलचे वर्चस्व असल्याचा दावा आमदार सुनील शेळके यांनी केला. तर दुसरीकडे भाजपाने 39 ग्रामपंचायतीवर ‘कमळ’ फुलले असल्याचे सांगत ‘गुलाल आम्हीच उधळला’ असल्याचे ठणकावून सांगितले आहे. एकंदरीत मावळात भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये आम्हीच वरचढ असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, 57 ग्रामपंचायतींपैकी सोमाटणे, नवलाख उंब्रे, येलघोल, आंबेगाव, पाचाणे, कुसगाव (पमा), दारूंब्रे व आढे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

चिठ्ठीवर ठरले भवितव्य

सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये जुन्नर, शिरूर, मुळशी तालुक्‍यात काही उमेदवारांना समसमान मते मिळाली. त्यामुळे निकाल टाय झाला. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्‍वर चिठ्ठीचा पर्याय अवलंबला. त्यामुळे येथे मतदारांनी दोघांनाही कौल दिला असला तरी त्यांचे भवितव्य चिठ्ठीवर अवलंबून राहिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button