गेल्या चार वर्षात “देवेंद्र नागपूरकरासह उध्दव यांचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा” पाहिला – सचिन साठे
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गेल्या चार वर्षात आम्ही काका हलवाई, चितळेंचे पेढे खालले. अशा अनेक हलवाईंचे पेढे खायला मिळाले. परंतु, गोरगरिबांचं एकही घर सत्ताधा-यांनी अधिकृत केलं नाही. गेल्या पाच वर्षात एखाद्या जातीवंत तमासगीरांला लाजवेल, असा तमाशा राज्यातील शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी करून दाखविला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी युती सरकारचे वाभाडे काढले.
मावळ लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ पिंपरी-चिंचवडमध्ये फोडण्यात आला. व्यासपीठावरून साठे बोलत होते. साठे म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी शास्ती कर माफीचे आश्वासन दिले होते. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचेही आश्वासन दिले आहे. रिंगरोड असेल, कर्जमाफी असेल, शेतक-यांचा परतावा असेल असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होता. त्यातील एकही प्रश्न सत्तेतील भाजप-शिवसेना सरकारने सोडविला नाही. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटल्याचे सांगून फ्लेक्स लावले. छातीठोकपणे प्रश्न आम्ही सोडविल्याचे सांगितले.
काका हलवाई, चितळे अशा अनेक हलवाईंचे पेढे भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांनी खावू घातले. प्रत्यक्षात मात्र, एकही अनधिकृत बांधकाम अधिकृत झालेलं नाही. गेल्या पाच वर्षांत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एखाद्या जातीवंत तमासगिराला लाजवेल असा तमाशा करून दाखविला आहे. त्याला नावच द्यायचे असेल तर देवेंद्र नागपूरकरासह उद्धव यांचा बहुढंगी, बहुरंगी तमाशा असे नाव देणे योग्य ठरेल, अशा शब्दांत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी भाजपची खिल्ली उडवली.