गॅलरीतून खाली डोकावून पाहत असताना तोल गेला: पिंपरीत सातव्या मजल्यावरुन खाली जमिनीवर पडून बालकाचा मृत्यू
![Peeking down from the gallery, he lost his balance… Child falls to the ground from seventh floor in Pimpri](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/pimpri-news.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
लहान मुलांकडे झालेलं दुर्लक्ष त्यांच्या जीवावर बेतू शकतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. गॅलरीत खेळत असताना तोल जाऊन खाली पडल्याने 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपरी चिंचवडमधील कोहिनूर शांग्रिला इमारतीच्या सातव्या मजल्यावर गावडे कुटुंब राहतं. अथर्व दीपक गावडे हा त्याच्या सहा वर्षीय भावासोबत गॅलरीत खेळत होता. तेव्हा त्यांची घरात काम करण्यात व्यस्त होती. भावासोबत खेळता-खेळता अथर्व गॅलरीवर चढला. गॅलरीतून तो खाली डोकावून पाहत होता, त्याच वेळी त्याचा तोल गेला आणि अथर्व थेट खाली जमिनीवर पडला.
लहान भावाने रडत जाऊन आईला हा प्रकार सांगितला, तेव्हा हा गंभीर प्रकार तिच्या लक्षात आला. अर्थवला जखमी अवस्थेत तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. काल दुपारी चार वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पिंपरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.