गुन्हेगारांचा सन्मान तर पथारी हातगाडीवाल्यांचा घोर अपमान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/PHOTO-5.jpg)
- पथारी हातगाडी व्यावसायिकांचा मेळावा
- काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांची टिका
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मनपाचे अधिकारी, पुढारी गुन्हेगारांचा सन्मान करतात. तर, पथारी हातगाडीवाल्यांचे नुकसान करुन अपमान करतात. रस्त्यावर, फुटपाथवर, सरकारी जागेवर नगरसेवक व अधिकारी मनमानी प्रमाणे आठवडा बाजाराला परवानगी देतात. उच्च न्यायालयाच्या हॉकर्स झोनच्या निर्मितीच्या आदेशाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत पायमल्ली केली जाते, हा कुठला न्याय असा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला आहे.
असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड लिंक रोडला पथारी हातगाडी व्यवसायिकांचा मेळावा सोमवारी शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी हातगाडी, पथारी विंगचे शहराध्यक्ष रमझान अत्तार, उपाध्यक्ष नितीन पटेकर, चिंचवड विभाग अध्यक्ष रोहिदास कुरपे, चिंचवड कार्याध्यक्ष अमोल देवकर यांना साठे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे असंघटीत कामगार कॉंग्रेसचे प्रभारी रमेश व्यास, शहर कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, घरेलू महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा शितल कोतवाल, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, विश्वास गजरमल, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सेवादलाचे शहराध्यक्ष मकर यादव, तारीक सय्यद, चंद्रशेखर यादव, नवनाथ डेंगळे आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या अधिका-यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शहरातील पथारी हातगाड्यांचे सर्वेक्षण करावे. फोटो पास द्यावा, भोसरी चौक, डांगे चौक, भक्ती शक्ती चौक येथे पूर्व सुचना न देता वारंवार कारवाई केली जाते. ती थांबवावी अन्यथा असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने पुन्हा न्यायालयात जाऊ, असा इशारा सुंदर कांबळे यांनी दिली.
सुत्रसंचालन शितल कोतवाल यांनी केले. तर, आभार तारीक सय्यद यांनी मानले.