गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ या उच्चभ्रू सोसायटीत गुंडाचा भरदिवसा राडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/20201201_142917-750x430-1.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ या उच्चभ्रू सोसायटीत घुसून गुन्हेगारांच्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने राडा घातला आहे. विशेष म्हणजे भरदिवसा हातामध्ये हत्यारे घेऊन, सोसायटीत घुसून बेदम मारहाण करत जखमी केल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोसायटीमध्ये रहात असलेल्या सिंग यांना मारहाण झालेली आहे. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. सराईत गुन्हेगार चंदन सिंग आणि प्रदीप सिंग आणि त्याचे साथीदार सोसायटीमध्ये घुसले. हातात पिस्तुल घेऊन एकाला मारहाण केली तसेच दमदाटी केल्याचा आरोप सोसायटीधारकांकडून केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या शिरगाव पोलीस चौकीचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काहींना ताब्यात घेऊन चौकशीसाठी चौकीला नेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या उच्चभ्रू सोसायटीच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक असतात. नेहमी आत येणाऱ्या वाहनाची, नागरिकांची तपासणी, चौकशी करतात. एवढी सुरक्षा असताना गुन्हेगारांचे टोळके आत आले कसे काय प्रश्न उपस्थित झाला आहे. नेमका काय प्रकार आहे याचा तपास पोलीस करत आहेत.