गरुड माचीतील वर्षा विहारासाठी महापालिका अधिका-यांची “स्ट्रॅटेजी”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/malhar-machi.jpg)
- खर्चाला स्थायीची मुक्त हस्ते उधळण
- ऐनवेळच्या प्रस्तावाला दिली मंजुरी
पिंपरी – “सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस” प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या अधिका-यांची “स्ट्रॅटेजी क्लेरिफिकेशन मिटिंग” उद्यापासून दोन दिवस आयोजित केली आहे. ही मिटिंग चक्क वर्षाविहाराच्या ठिकाणी ठेवली आहे. मुळशीतील गरुड माची हे वर्षाविहाराचे लोकप्रिय ठिकाण असून याठिकाणी मंद पावसाचा थंडावा अंगावर घेत पालिकेचे अधिकारी पिंपरी-चिंचवडच्या विकासाची “स्ट्रॅटेजी” ठरविणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विकासाच्या नावाखाली अधिका-यांचे अभ्यास दौरे काढले जातात. अनोख्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याची परंपरा काही आजपासून सुरू नाही. विकासाच्या नावाखाली प्रशासनाने अधिका-यांची बडदास्त पुरवत अलिशान व्यवस्था केली आहे. उद्या शुक्रवारी (दि. 29) आणि शनिवारी (दि. 30) सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस प्रकल्पांतर्गत स्ट्रॅटेजी क्लेरिफिकेशन मिटींग आयोजित केली आहे. ही मिटींग चक्क मुळशी येथील गरूड माची या थंड हवेच्या ठिकाणी आयोजित केली आहे.
शहरात पंचतारांकीत हॉटेल असताना प्रशासनाने मात्र ही मिटींग वर्षाविहाराच्या ठिकाणी ठेवली आहे. या मिटींगमध्ये महापालिकेच्या विविध विभागांतील 50 अधिकारी सहभागी होणार आहेत. अधिका-यांची बडदास्त पुरविण्यासाठी दोन लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चाला माहिती व तंत्रज्ञान विभागाने ऐनवेळी प्रस्ताव मांडून स्थायी समितीची मान्यता घेतली आहे. स्थायीनेही विषयाचे गांभीर्य समजून न घेता याला मंजुरी दिली आहे. मोठ-मोठ्या प्रकल्पांची स्ट्रॅटेजी ठरविण्यासाठी शहरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये यापूर्वी प्रशासकीय बैठका झालेल्या आहेत. मात्र, ही बैठक चक्क थंड हवेच्या ठिकाणी ठेवल्याने चर्चेचा विषय बनले आहे. निसर्गाच्या सानिध्यात शुक्रवार आणि शनिवारी पालिकेचे 50 अधिकारी पिंपरी-चिंचवडच्या विकासाची स्ट्रॅटेजी ठरविणार आहेत. मात्र, याठिकाणी खरच मिटींग होणार आहे, की विरंगुळा करण्यासाठी अधिका-यांची व्यवस्था केली आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होणार का…
गरुडमाची हे ठिकाण मुळशी तालुक्यातील प्रसिध्द ताम्हिणी घाटात वसलेले आहे. याठिकाणी पावसाळ्याच्या तोंडावर रिमझीम पावसाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक या घाटाकडे धाव घेतात. संपूर्ण घाट परिसर वनक्षेत्रात दडलेला असल्यामुळे मंद धुक्याचा आल्हाददायक थंडावा अंगावर घेत निवांतपणाचा अनुभवही घेता येतो. त्यामुळे सध्या पर्यटकांची या घाटाकडे रांग लागली आहे. याठिकाणी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट सेंटरही आहे. त्यामध्ये प्रशिक्षण, प्रशासकीय बैठका, कार्यक्रम घेतले जातात. मात्र, शहराच्या विकासाची रुपरेषा ठरणार की अधिका-यांचा विरंगुळा होणार, याबाबत साशंकता आहे.