खेळताना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू, च-होलीत घडली घटना
पिंपरी (महा ई न्यूज ) – खेळताना विहिरीत पडून एका बालकाचा मृत्यू झाला ही घटना च-होली येथे शनिवारी रात्री घडली. श्रीयश सागर सावळे (वय ४, रा. च-होली) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.
दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीयश आणि त्याचा मित्र शनिवारी सायंकाळी खेळत-खेळत घराजवळील विहिरीवर गेले. श्रीयश हा विहिरीत डोकावून पाहत असताना त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला.
त्यानंतर त्याचा मित्र आपल्या आईकडे जाऊन श्रीयश पाण्यात खेळण्यासाठी गेला आहे. मलादेखील तिथे पाण्यात खेळण्यासाठी जायचे आहे, असा हट्ट मित्राने आपल्या आईकडे धरला. यामुळे श्रेयस कुठे पाण्यात खेळण्यासाठी गेला आहे? हे पाहण्याकरता मित्राची आई आपल्या मुलाला घेऊन विहिरीजवळ आली. त्यावेळी श्रीयश पाण्यात पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी याबाबत अग्निशामक दलास सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास वर्दी दिली. भोसरी अग्निशामक दलाच्या पथकाने तब्बल पाच तास श्रेयशचा शोध घेतला. रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास श्रीयशचा मृतदेह मिळून आला. याबाबत अधिक तपास दिघी पोलिस करीत आहेत.