खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला हिंजवडीतील कोंडीचा “आढावा”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Supriya-Sule.jpg)
- रस्त्याची प्रत्यक्ष केली पाहणी
- अधिका-यांना दिल्या सूचना
पिंपरी – आयटी पार्कमुळे हिंजवडीत होणा-या वाहतुक कोंडीची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोमवारी (दि. 10) केली. येथील वाहतुकीची समस्या पाहून त्यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना महत्वाच्या सूचना दिल्या.
खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी ग्रामंपचायात कार्यालयात आज सकाळी साडेआठ वाजता पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंजवडी ग्रामस्थ, हिंजवडी असोसिएशन यांची संयुक्त बैठक घेतली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिका-यांना त्यांनी विविध सूचना दिल्या. बैठकीला हिंजवडीच्या सरपंच दीपाली साखरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, पिंपरी पालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, पुण्याचे नगरसेवक सचिन दोडके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, माजी सरपंच श्यामराव हुलावळे, दत्ता साखरे, सागर साखरे यांच्यासह फ्री-अप हिंजवडीचे सुधीर देशमुख, सचिन लोंढे उपस्थित होते.
सुळे यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन रस्त्याची अवस्था पाहिली. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. हे खड्डे त्वरीत बुजविण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. माणचा एमआयडीसीला जोडणारा 100 मीटरचा रस्ता त्वरित दुरुस्त करावा. पीएमआरडीए, एमआयडीसीने हिंजवडीतील शेतक-यांना योग्य मोबदला देऊन जागा ताब्यात घ्याव्यात. प्रलंबित रस्ते विकसित करावेत. त्यामुळे शिवाजी चौक ते वाकड रस्त्यावरील वाहनांचा ताण कमी होईल. परिणामी, वाहतूक कोंडी देखील कमी होण्यास मदत होणार आहे.
रस्त्यांवरील अतिक्रमणांवर एमआयडीसीने कारवाई केल्यामुळे रस्ता मोकळा झाला आहे. यापुढे देखील रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना सुळे यांनी दिल्या. पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलिस यांनी वाहतूक कोडींचा अभ्यास करावा. त्यातील अडीअडचणी जाणून घेऊन आठ दिवसात दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.