खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याकडे ३३ कोटींची मालमत्ता
पुणे – शिरूरमधील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 19 कोटी 79 लाख रुपयांची तर पत्नीकडे 8 कोटी 72 लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर पती-पत्नी संयुक्त नावेही 4 कोटी 97 लाख रुपयांची गुंतवणूक असून, एकूण सुमारे 33 कोटींची मालमत्ता पती-पत्नीकडे आहे.
आढळराव पाटील यांच्याकडे 17 हजार 308 रुपये तर पत्नीकडे 1 लाख 75 हजार रुपये रोख रक्कम आहे. तर संयुक्त खात्यामध्ये 82 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. आढळराव पाटील यांच्याकडे 34 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक मुदत ठेवीच्या स्वरूपात आहे. तर पत्नीच्या नावावर 46 हजार रुपयांची गुंतवणूक मुदत ठेवी मध्ये आहे. तर संयुक्त खात्यामध्ये 1 लाख 32 हजार रुपयांच्या मुदत ठेवी आहे. बॉण्ड, शेअर्स यामध्ये आढळराव पाटील यांनी 8 लाख 44 रुपयांची तर त्यांच्या पत्नीने 12 लाख 84 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. पोस्ट खाते, एलआयसी आदींमध्ये 1 कोटी 20 लाख रुपयांची गुंतवणूक आढळराव पाटील यांनी तर पत्नीने 17 लाख 65 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. आढळराव पाटील यांच्याकडे 20 हजार रुपये किमतीचे वाहन आहे. तर पत्नीच्या नावे वाहन नाही. आढळराव पाटील यांच्या पत्नीकडे 49 लाख किमतीचे सोने-चांदीचे दागिने आहेत.
आढळराव पाटील यांच्याकडे चिंचोडी, लांडेवाडी, मंचर, राजगुरुनगर, पुणे आणि मुंबई येथे स्थावर मालमत्ता असून त्यांची किंमत 16 कोटी 80 लाख रुपये इतकी आहे. तर पत्नीच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेची किंमत 6 कोटी 93 लाख रुपये इतकी आहे. तसेच आढळराव पाटील यांच्या नावावर 2 कोटी 5 लाख रुपयांचे तर पत्नीच्या नावे 2 कोटी 93 लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात दिली आहे.