क्रांतिवीर चापेकर स्मृती संग्रहालयाच्या कार्यक्रमात भाजपकडून शांततेचे आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/जगताप.jpg)
- मुख्यमंत्री करणार शिष्टमंडळांशी चर्चा
- आमदार लक्ष्मण जगताप यांची माहिती
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकर स्मृती संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. 23) होणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री विविध संघटनांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करणार आहेत.
भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकातून याबाबत माहिती दिली आहे. जगताप यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, क्रांतिविर चापेकरबंधूंनी स्वातंत्र्य लढ्यात बहुमोल योगदान दिले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची इतिहासात नोंद झाली आहे. अशा स्वातंत्र्य योध्दांची शौर्यगाथा देशासमोर मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी चिंचवड येथे स्मृती संग्रहालय उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी या माध्यमातून शहरवासीयांना उपलब्ध होणार आहे. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शौर्याचा गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचण्यास या स्मृती संग्रहालयातून मदत होणार आहे. त्यामुळे संग्रहालयाच्या भूमीपूजनाचा सोहळा उत्साहात आणि कोणतेही गालबोट न लागता पार पडणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वच घटकांनी शांतता राखणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे विमानतळावर विविध संघटनांच्या आणि संस्थांच्या शिष्टमंडळांना भेटणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहर भाजपातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना त्याबाबत विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस या शिष्टमंडळांशी चर्चा करणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाशीही मुख्यमंत्री यावेळी चर्चा करणार आहेत. मराठा समाजाच्या मागण्या यावेळी मुख्यमंत्री समजून घेणार आहेत. याचप्रमाणे विविध समाज संघटना, संस्थांच्या शिष्टमंडळांशीही मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. त्यामुळे सर्वच संघटना आणि संस्थांसह प्रत्येक घटकाच्या शिष्टमंडळांनी याबाबत सहकार्य करणे आवश्यक आहे. जेणे करून क्रांतिवीर चापेकर स्मृती संग्रहालयाचा भूमिपूजन सोहळा शांततेत पार पडेल.
मुख्यमंत्र्यांना भेटू इच्छिणा-या शिष्टमंडळांच्या सदस्यांनी आमदार लक्ष्मण जगताप किंवा भाजप प्रवक्ते अमोल थोरात(08087023231) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.