कोरोना प्रतिबंधित लसीकरण; पिंपरी चिंचवडमधून साडेतेरा हजारांची नोंदणी
![कोरोना प्रतिबंधित लसीकरण; पिंपरी चिंचवडमधून साडेतेरा हजारांची नोंदणी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/10.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
कोरोना प्रतिबंधित लसीकरणासाठी राज्यभरातील सरकारी व खासगी रुग्णालयांतील डाॅक्टर, परिचारिकेसह कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातून सुमारे 13 हजार 500 जणांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली. दरम्यान, कोरोना लसीकरण नोंदणी कर्मचा-यांचा उत्साह कमी दिसून येत आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्र सरकारने प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, रुग्णांच्या संपर्कात असलेले वैद्यकीय, निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सरकारी आणि खासगी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावी, असे आदेश केंद्राने दिले आहेत. त्यामुळे शहरातील सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू झाले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी खासगी रुग्णालयांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पोर्टलवर ही नोंदणी करता येणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या पोर्टवरल नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस दिली जाणार आहे. त्यामुळे तातडीने नोंदणी करावी, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच अद्यापही शहरातील अनेक खासगी रुग्णालयांकडून नोंदणी प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.