कोरोनाशी लढणाऱ्या ‘अनसंग वॉरिअर्स’ चा होणार गौरव
![Unsung Warriors fighting Corona will be honored](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/corona-वोर्रिऔ.jpg)
– चिखली-मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचा पुढाकार
– भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा
पिंपरी । प्रतिनिधी
कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य अन् सुरक्षिततेसाठी लढणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील कोरोना योद्धांचा प्रातिनिधिक स्वरुपात गौरव केला जाणार आहे. ‘अनसंग वॉरिअर्स, प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’ या पुरस्कारांचे वितरण चिखली- मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या पुढाकार केले जाईल, अशी माहिती फेडरेशनचे संजीवन सांगळे यांनी दिली.
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात शनिवारी, दि. २ जानेवारी २०२१ रोजी सांयकाळी ५ वाजता हा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा होईल. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे २० हजार नागरिकांनी कोरोना योद्धे म्हणून प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे काम केले आहे. प्रशासकीय सूचना आणि नियामांचे पालन करीत या सर्व लोकांचा सन्मान- गौरव करणे शक्य नाही. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरुपात केवळ २५ कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संजीवन सांगळे यांनी दिली.
कोरोना योद्धांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न…
संजीवन सांगळे म्हणाले की, कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढणाऱ्या आणि आपल्या शहराला सुरक्षित ठेवणाऱ्या सर्व कोरोना योद्धांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून पिंपरी-चिंचवड शहर तसेच चिखली-मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशन आणि अविरत श्रमदान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘अनसंग वॉरिअर्स, प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’ या पुरस्काराचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात येणार आहे.