कोरोनाच्या नावाखाली राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांची हत्त्या, पत्नीचा आरोप
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसून त्यांची हत्त्या घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्या पत्नी फैमिदा जावेद शेख यांनी केला आहे. शेख यांचे मॅनेजर, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि अन्य एकजण त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात फैमिदा शेख यांनी पोलीस महासंचालक आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. इखलास सय्यद, डॉ. वाघ आणि शाहरूक शेख या तिघांनी माझ्या पतीची हत्त्या घडवून आणल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. जावेद शेख यांना कोरोना झाल्यामुळे इखलास सय्यद यांनी आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, शेख यांना उपचार चुकीच्या पध्दतीने होत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी तातडीने याठिकाणावरून हलण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा त्यांना अन्य रुग्णालयात शिफ्ट करण्यासाठी घेवून जात असताना इखलास आणि डॉ. वाघ यांनी त्यास नकार दिला.
29 जुलै रोजी त्यांना रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याची माहिती शेख यांच्या कुटुंबियांना देण्यात आली नाही. शेख यांच्या मृत्युनंतर इखलास याने त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रे गायब केली. इखलासने शाहरूक यांना जावेद शेख यांच्याकडून वेळोवेळी मदत केली आहे. शेख यांच्या नावावर असलेले दस्तावेज, गाडी आणि अन्य बाबी इखलास आणि शाहरूक यांनी काढून घेतल्या आहेत. त्यांनी शेख यांच्या मुलाला धमकी दिली. पत्नीला कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी धमकावले आहे. न केल्यास गायब करण्याची धमकी देखील दिली आहे, असा आरोप निवेदनात केला आहे.
जावेद शेख यांच्या कमी शिक्षणाचा व राजकीय वलयाचा फायदा घेऊन इखलास आणि शाहरुक यांनी स्वतःच्या कंपन्या काढल्या. त्या कंपन्या जावेद शेख यांच्या असल्याचे भासविले. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी मिळून जावेद शेख यांच्या सोन्याचा आणि रोख रक्कमेचा अपहार केला. जावेद शेख यांनी याबाबत विचारू नये, यासाठी त्यांची हत्त्या घडवून आणल्याचा आरोप पत्नी फैमिदा शेख यांनी केला. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.