breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोणाचाही राजेशाही थाट खपवून घेणार नाही – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

पिंपरी / महाईन्यूज

लोकशाहीमध्ये लोकनिती महत्वाची असते. मनमानी राजासारखे कोणीही वागणे उचित नाही. लोकशाहीनुसार असलेले कायद्याचे राज्य सर्वांना अपेक्षित असून प्रत्येकाने निस्पृहभावनेने आपले कर्तव्य बजावल्यास सुराज्य निर्माण होईल. महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वाटावे असे सुराज्य निर्माण करण्यासाठी आपण अतोनात अहोरात्र प्रयत्न करण्यास कटिबध्द असून यासाठी नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील महिला सुरक्षा बाबींविषयी चर्चा करण्यासाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या समवेत आज महिला नगरसदस्यांची बैठक आयोजित केली होती. कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठकीत करण्यात आलेल्या विविध सुचनांना उत्तर देताना आयुक्त कृष्णप्रकाश बोलत होते. या बैठकीस पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, नगरसदस्या सिमा सावळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे मंचावर उपस्थित होते. तर अ प्रभाग समिती सभापती शर्मिला बाबर, ब प्रभाग समिती सभापती सुरेश भोईर, मनसेचे गटनेते सचिन चिखले, माजी महापौर मंगलाताई कदम यांच्यासह नगरसदस्या बैठकीस उपस्थित होत्या.

शहरातील अवैध धंदे, दारु, मटका, जुगार अड्डे गुन्हेगारीचे केंद्र असून त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील उद्भवत असल्याने अशा अवैध बाबींवर कारवाई करावी, शहरातील काही उदयानात होणा-या अश्लील प्रकारास आळा घालण्यात यावा, शाळा महाविद्यालय परिसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण विचारात घेता त्याठिकाणी पोलीसांचे भरारी पथक नियुक्त करावे, रात्रीची गस्त वाढवावी, अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी उपाययोजना करुन या क्षेत्रातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे समुपदेशन करावे, गुन्हेगारी टोळयांवर वचक बसवावा, पोलीसांनी नागरीकांना सहकार्य करावे, वाहनांचे रस्त्यावरील होणारे अतिक्रमण दूर करुन वाहतूकीचे सुरळीत नियोजन करावे, शहरात आवश्यक ठिकाणी चालू स्थितीतील सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, पोलीसांकडे महिला तक्रार देण्यासाठी गेल्यास तिला सन्मानपूर्वक वागणूक देवून तीची तक्रार तात्काळ दाखल करुन घ्यावी, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची पोलीस दप्तरी नोंद असावी, पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये दलालांचा वाढता हस्तक्षेप रोखावा आदी सूचना बैठकीत उपस्थित नगरसदस्यांनी केल्या.

शहराला शिस्त लावण्याचे काम पोलीसांच्या माध्यमातून घडेल अशी अपेक्षा व्यक्त करुन महापौर ढोरे म्हणाल्या, विकसित झालेल्या या शहरात जर महिलांच्या छेडछाडीसारख्या घटना घडत असतील तर विकास अर्थहीन ठरतो. महापालिकेने पोलीसांसाठी आवश्यक जागा तसेच सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. पोलीसांनी महिला सुरक्षेला प्राधान्य देवून शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत करावी. खाकी वर्दीची जरब गुन्हेगारांवर बसल्यास महिला अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. महिलांना स्वसुरक्षेसाठी प्रशिक्षण देवून आत्मनिर्भर बनवावे अशी सूचना यावेळी महापौरांनी पोलीस आयुक्त यांना केली.

बैठकीत आलेल्या सुचनांना उत्तर देताना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, बैठकीत आलेल्या सुचना तथा तक्रारींचे स्वरुप पाहता या समस्या केवळ गुन्हेगारीशी संबधित नसून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा बाबींशी निगडीत आहे. तसेच पोलीस आणि जनतेच्या मानसिकतेशीही याचा संबंध येतो. पोलीस दलातील ९० टक्के लोक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतात. मात्र उर्वरीत १० टक्के लोकांमुळे पोलीस दलाची प्रतिम मलिन होते. म्हणून नियमबाहय काम करणा-या पोलीसांवर नियमाधिन कारवाई करण्यात येईल. तसेच पोलीसांच्या अवती – भोवती असणा-या दलाल आणि तडजोड करणा-यांना दूर ठेवण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असून नागरिकांनी न घाबरता तक्रार देण्यास पुढे आले पाहिजे. शाळा कॉलेज परिसरात पोलीसांचे पथक नेमले जाईल. सराईत गुन्हेगारांवर तडीपारी सारखी कारवाईदेखील केली जाईल. गैरकायदेशीर कृत्याला आळा घातल्यास आपण सभ्य समाज निर्माण करु शकू. मात्र कोणीही कायदा हातात घेवू नये. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रभूत समजून पोलीसांनी आपले कर्तव्य बजवावे. युवा शक्तीचे गुन्हेगारी क्षेत्राकडे वाढत चाललेले आकर्षण ही धोक्याची घंटा असून त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. पोलीसांकडून होणारी कारवाई नियमानुसारच होईल. नियमांची अंमलबजावणी करताना पोलीसांच्या कामात कोणीही हस्तक्षेप करु नये. पोलीसांची संख्या कमी असली तरी नागरिकांच्या सहकार्य आणि सहभागातून ही उणीव भरुन निघेल. सर्वसामान्य नागरिक हाच विश्वासू माहितीचा स्त्रोत आहे. यातून गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना कडक शासन करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेवून पोलीसांना मदत करावी असे आवाहन कृष्णप्रकाश यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पक्षनेते नामदेव ढाके यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. आभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button