breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केमिस्टकडे जाण्याच्या बहाण्याने दुबईला पळ, ‘कोरोनाग्रस्त’ महिलेविरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल..!

पिंपरी । केमिस्टकडे जाण्याच्या बहाण्याने होम क्वारंटाईनच्या आदेशाचं उल्लंघन करुन दुबईला निघून  गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाग्रस्त महिलेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांमध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याचा, तसेच कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये कलम 188, 269, 270 तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायदा ह्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित 30 वर्षीय महिलेने शनिवार 11 जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये आदित्य बिर्ला रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली होती. रविवारी 12 जुलैला तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तिला कोरोनाची सौम्य लक्षणं होती. त्यामुळे तिने गृह विलगीकरणात राहू देण्याची विनंती केली होती. त्यानुसार तिला होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

मेडिकलमध्ये जात असल्याचे सांगून 17 जुलैच्या रात्री महिला सोसायटीच्या बाहेर पडली. मात्र बराच वेळ उलटून गेल्यानंतरही ती परत आली नाही. त्यानंतर तिने थेट दुबईला पळ काढला. विशेष म्हणजे दुबईला पोहोचल्यानंतर संबंधित महिलेने शारजा विमानतळावरुन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा मेसेज सोसायटीतील सदस्यांना पाठवला. सोसायटीच्या सदस्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार दिली. मात्र त्या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा सोसायटीने केला होता. त्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाने तक्रार केली आणि हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवडमधील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 11 हजार 494 वर पोहोचला आहे. तर कोरोनाबळींची एकूण संख्या 209 वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button