केंद्र सरकारकडून नागरिकांची लुट – क्रांतिकुमार कडुलकर
पिंपरी । प्रतिनिधी
सरकार आर्थिक दिवाळखोरीत गेले आहे. त्यामुळे केंद्र सरकार प्रचंड करवाढ करत आहेत. त्यामुळे सरकार जनतेला लुटत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. सरकारच्या इंधन दरवाढीचा माकपने निषेद नोंदवला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडुलकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा आरोप केला.
कडुलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, इंधन दरवाढीमुळे केंद्र आणि राज्य सरकारला सहज महसूल मिळत आहे. केंद्र सरकार आणि पेट्रोल कंपन्यांनी कोरोना काळात अब्जावधी रुपयाची कमाई केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 20 ते 45 टक्क्याने घसरल्या आहेत. तरीही भारतात गेल्या वर्षभरात वारंवार इंधनदरवाढ केली जात असून सर्वसामान्य जनतेला याचा भूर्दंड भरवा लागत आहे.
जनतेचे हाल होत आहेत आणि सरकार मालामाल अशी परिस्थिती आहे. सर्वसामान्य जनतेला हैराण करणारी इंधन दरवाढ सरकारने कमी करावी आणि इंधन विक्रीसाठी जीएसटी कर लागू करावा, अशी मागणी माकपच्या क्रांतिकुमार कडुलकर यांनी केली आहे.