breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कामगार नेते शरद राव यांच्या अर्धपुतळ्याचे उद्या शरद पवार यांच्या हस्ते अनावरण
पिंपरी ( महा ई न्यूज )- तळेगाव दाभाडे येथे कामगार नेते शरद राव यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या (शनिवारी) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे कार्याध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली. यावेळी मुंबई म्युनिसीपल मजदूर युनियनचे सचिव गोविंद कामतेकर, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, आबा गोरे, संजय कुटे, चारुशिला जोशी आदी उपस्थित होते.
झिंजुर्डे यांनी सांगितले की, तळेगाव दाभाडे येथील डॉ. राममोहन लोहिया समाजवादी विद्यापीठ कडोलकर कॉलनी येथे (शनिवारी दि. 1 सप्टेंबर) रोजी सकाळी दहा वाजता दिवंगत कामगार नेते यांच्या पंचधातूच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मुंबई म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, अध्यक्ष हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महाबळ शेट्टी, निमंत्रक . सुखदेव काशीद, रमेश मालवीय, वामन कविस्कर, अशोक जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
शरद राव यांनी चौदा राज्यांमधल्या अठरा लाख कामगारांचे नेतृत्व केले. एका गरीब कामगाराच्या घरात त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे कामगारांच्या वेदनांची जाणीव मनात ठेवूनच त्यांनी कामगार संघटनेचे काम पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ केले. कामगारांसाठी लढणारा शरद राव नावाचा हा युगपुरुष कामगार चळवळीच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले एक रत्न होते. जेंव्हा जेंव्हा कामगार आंदोलनात संभ्रम निर्माण होत असे, तेंव्हा शरद राव हे कामगार चळवळीला नवनिर्माणाच्या मार्गावर घेऊन जायचे. असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास कामगारांनी व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.