पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत 30 जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. तरी, लाभार्थी नागरिकांनी योजनांच्या लाभासाठी जवळच्या नागरी सुविधा केंद्रात अर्ज जमा करावेत, असे आवाहन समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती, अपंग, महिला, विद्यार्थी, दिव्यांग मुला-मुली, विधवा महिला, विविध प्रशिक्षित महिला अशांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थसहाय योजना राबविल्या जातात. महिला व बालकल्याण योजनेंतर्गत 11 प्रकारचा लाभ दिला जातो. मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत चार प्रकारचे लाभ दिले जातात. अपंग कल्याणकारी योजनेंतर्गत 9 प्रकारचे लाभ दिले जातात. तर, इतर कल्याणकारी योजनांतर्गत सात प्रकारचा लाभ दिला जातो.
या योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत 30 जानेवारी पर्यंत देण्यात आलेली आहे. ही मुदत दोन दिवसांत संपुष्टात येत आहे. आजअखेर पालिकेकडे वेगवेगळ्या योजनांचे एकूण 18 हजार 398 अर्ज प्राप्त झाले आहेत. जास्ती जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी जवळच्या नागरी सुविधा केंद्रात किंवा क्षेत्रीय कार्यालयात किंवा महापालिकेकडे अर्ज करावेत, असे अवाहन ऐवले यांनी केले आहे.