कचरा समस्या व व्यवस्थापन विषयावर शिवसेनेचे चर्चासत्र
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा समस्या आणि व्यवस्थापन या विषयावर शहर शिवसेनेच्या वतीने नागरिकांचे चर्चासत्र घेण्यात येणार आहे. चिंचवड येथील अटो क्लस्टर सभागृहात हे चर्चासत्र उद्या गुरूवारी (दि. 18) होणार असून सकाळी दहा वाजता नागरिकांनी या चर्चासत्रात उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवड यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कचरा समस्या शहरातील गंभीर समस्या बनली आहे. त्यावर तोडगा काढण्याचे महापालिका प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कचरा व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात याची जाण करून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आजची कचरा समस्या व भविष्यातील कचरा व्यवस्थापन विषयावर चर्चासत्र ठेवण्यात आले आहे. उद्या चिंचवड येथील अटो क्लस्टर सभागृहात सकाळी दहा वाजता चर्चासत्र सुरू होणार आहे.
शहरातील सामाजिक, पर्यावरण, आरोग्य क्षेत्रातील तज्ञ तसेच सोसायटीचे पदाधिकारी, प्रतिनिधी, कचरा वेचक प्रतिनिधी यांनी चर्चासत्राला उपस्थित राहणे महत्वाचे आहे. चर्चेतून कचरा समस्येवर कायमचा तोडगा काढल्यास स्वच्छ व सुंदर पिंपरी-चिंचवड हे ब्रिद सत्यात उतरेल. नागरिकांनी चर्चासत्रास उपस्थित रहावे, असे आवाहन चिंचवडे यांनी केले आहे.