कंत्राटदाराने मजुराला पेट्रोल टाकून पेटविले, हिंजवडीतील घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/crime-1-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
सेंट्रिंग काम करणाऱ्या मजुराने केलेल्या कामाच्या पगारासाठी तगादा लावल्याने संबंधित कंत्राटदाराने एका साथीदाराच्या साह्याने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना ताथवडे येथे घडली.
सुभाष विश्वनाथ साह (वय ३३, सध्या रा. ताथवडे लेबर कॅम्प, मूळ बिहार) असे जखमी मजुराचे नाव आहे. सुभाषला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठेकेदार महम्मद अन्वर झुमरातिया (वय ४०, रा. तापकीरनगर) व त्याचा साथीदार संतोषकुमार हरकराम (वय ३६, रा. वर्धमान लेबर कॅम्प, ताथवडे) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
घटनेबाबत हिंजवडीचे सहायक निरीक्षक उद्धव खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष हा गेल्या काही महिन्यांपासून आरोपी महम्मद या ठेकेदाराकडे बांधकाम साइटवर सेंट्रिंगचे काम करत होता. पगार थकल्याने तो वारंवार मागणी करत होता. आरोपीने ३ फेब्रुवारीला दुपारी चारच्या सुमारास त्याला ताथवडे येथील मुंबई-बंगळूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर बोलवून घेतले. तेथे त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यात तो ४० टक्के भाजला आहे. तसेच घडलेला हा प्रकार कुणाला सांगितल्यास इंजेक्शन देऊन ठार मारू, अशी धमकीही दिली. दरम्यान, त्याच्यावर काळेवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान विजेचा शॉक बसून भाजल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितले होते. परंतु, शुद्धीवर आल्यानंतर त्याने हिंजवडी पोलिसांना घडलेला हा प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी फरार आहेत.