औद्योगिक क्रांती होण्यात कॉंग्रेसचा वाटा – डॉ. कैलास कदम
![The role of Congress in the Industrial Revolution - Dr. Callas steps](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/कैलास-कदम.jpg)
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इंटक व हिंद कामगार संघटनेचे रक्तदान शिबिर
पिंपरी | प्रतिनिधी
नव्वदच्या दशकानंतर देशात झालेली औद्योगिक क्रांती, अर्थक्रांती, दुरचित्रवाणी व दुरध्वनी आणि संगणक युग, ऑटोमोबाईल क्षेत्राचा विकास यांचे श्रेय सोनिया गांधी यांचेच आहे. केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना प्रचलित कामगार कायद्यांची कडक अमंलबजावणी होत होती. कामगारांच्या कष्टामुळेच देश विकसनशील मार्गावर असल्याचे प्रतिपादन इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष व हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘इंटक’ आणि हिंद कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.९ डिसेंबर) खराळवाडी पिंपरी येथे डॉ. कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात जमा झालेल्या ४५० हुन जास्त रक्ताच्या बाटल्या पिंपरीतील पीएसआय ब्लड बॅंकेला देण्यात आल्या.
कॉंग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यपुर्व काळातील देशातील सर्वात जुना पक्ष आहे. देशातील बहुभाषिक, बहुधार्मिक संस्कृतीची जोपासना करीत समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्याचे कॉंग्रेसचे धोरण आहे. महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्वावर वाटचाल करणा-या या पक्षाचे दोन पंतप्रधान दहशतवादाचे बळी ठरले आहेत. तरीही धैर्याने न डगमगता खंबीरपणे सोनिया गांधी यांनी देशसेवेचे व्रत स्विकारले. कामगारांच्या, शेतक-यांच्या कष्टाचा सन्मान करणा-या सोनिया गांधी यांना दिर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष व हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिल्या.
या शिबीरात पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरासह तळेगाव, लोणावळा, चाकण, रांजणगाव, सणसवाडी, जेजुरी, बारामती, खेड, भोर येथील विविध कंपन्यांतील हिंद कामगार संघटनेच्या ४५० हून जास्त कामगार सभासदांनी उर्त्स्फूतपणे रक्तदान केले.
…………………………