breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एक खड्डा बुजविण्यास 18 हजार रुपये खर्च ; उच्चस्तरीय चाैकशी करा – माजी नगरसेवक मारुती भापकर

पिंपरी ( महा ई न्यूज )- शहरातील एक खड्डा बुजविण्यास तब्बल १८ हजार रूपये एवढा खर्च केला आहे. नागपूर कनेक्शन असणारे आयुक्त श्रावण हर्डीकर व शहर अभियंता यांनी आपल्या मर्जीतला ठेकेदार पोसण्यासाठी तत्कालीन सभापती व सदस्यांशी संगनमत करून खड्डा बुजविण्याच्या नावाखाली पालिका तिजोरीला खड्डा पाडण्याचे काम केले आहे. यामध्ये अधिकारी पदाधिकाऱ्यांचे ठेकेदार, सल्लागार संगनमत होऊन करदात्या नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा आरोप माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी केला आहे. या प्रकरणाची शासन स्तरावरून उच्चस्तरीय चौकशी होऊन यातील दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात भापकर यांनीम्हटले आहे की, शहरात रस्ते विकसित व डांबरी करणासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये स्थापत्य विभागाकडून खर्च केला जातो. तरीही दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. या वर्षी पहिल्याच पावसात रस्त्यांवर हजारो खड्डे असताना शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी शहरात एकूण २३७९ खड्डे आहेत त्यापैकी २०३० भरून ८५% काम पूर्ण झालेले आहे तर केवळ ३४९ खड्डे आहेत अशी खोटी माहिती दिली आहे.

शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्यास ठेकेदाराकडून दुरुस्त करून घेणे किंवा त्याच्यावर दंडात्मक कार्यवाहीची तरतूद कामाच्या करारनाम्यात आहे. असे असताना महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला वटणीवर आणायचे सोडून महापालिका तिजोरीतून हे खड्डे बुजविण्यासाठी कोट्यावधींचे कंत्राट काढले. यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर व तत्कालिन स्थायी सभापती यांनी स्थायी समिती सभा ठराव क्र.२५०८ दि.११/०४/२०१८ ला मंजुरी दिली. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी नागपूरचे ठेकेदार मे.अंजनी लॉजिस्टिक यांना काम देण्यासाठी जेट पॅचर पोथॉल पॅचिंग मशीन हे नवीन तंत्रज्ञान वापरण्याबाबतची निविदा इ प्रभागाकडून २३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत काढण्यात आली. निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या मे.अंजनी लॉजिस्टिक या ठेकेदाराला ८ कोटी ३२ लाख ४१ हजार ७७२ रुपयांमध्ये हे खड्डे बुजविण्याचे कंत्राट देण्यात आले. त्याचवेळी निविदेवर संशय व्यक्त झाला होता. 

प्रशासनाने या कामाची मुदत ३६ महिने म्हणजे जवळपास ३ वर्ष ठेवली आहे. मात्र प्रत्यक्षात हा ठेकेदार फक्त पावसाळ्यातील ४ महिने खड्डे बुजविण्याचे काम करणार आहे. ३ महिन्यांत सुमारे २ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च या कामावर होणार आहे. मात्र पहिल्याच पावसाळ्यात या कामाची बोंब झाली आहे. १ जून पासून शहरात निदर्शनास ४४६५ खड्ड्यांपैकी  जेट पॅचर पोथॉल पॅचिंग मशीनच्या सहाय्याने फक्त ४५८ खड्डे बुजविल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या खड्ड्याचा एकूण आकार ५४८४ चौ.मी. इतका आहे. तर जेट पॅचर पोथॉल पॅचिंग मशीनचे काम देताना ४ महिन्यांत प्रत्येक प्रभागातील १९०० चौ.मी आकाराचे खड्डे बुजवायचे आहेत. त्यानुसार ४ महिन्यांत जास्तीत जास्त १५२०० चौ.मी आकाराचे खड्डे बुजविले जाणार आहेत. हे प्रमाण बघता ४ महिन्यांत जवळपास १५०० खड्डे या मशीनच्या सहाय्याने बुजविले जाऊ शकतात. त्या प्रमाणे ४ महिन्यांत २ कोटी ८० लाखाचा खर्च आणि १५०० खड्डे बुजविल्यास प्रती खड्डा १८ हजार रूपये इतका खर्च येत असल्याचे स्पष्ट होते.

नागपूर कनेक्शन असणारे आयुक्त श्रावण हर्डीकर व शहर अभियंता यांनी आपल्या मर्जीतला ठेकेदार पोसण्यासाठी तत्कालीन सभापती व सदस्यांशी संगनमत करून खड्डा बुजविण्याच्या नावाखाली पालिका तिजोरीला खड्डा पाडण्याचे काम केले आहे. यामध्ये अधिकारी पदाधिकाऱ्यांचे ठेकेदार, सल्लागार संगनमत होऊन करदात्या नागरिकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे या प्रकरणाची शासन स्तरावरून उच्चस्तरीय चौकशी होऊन यातील दोषींवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी मारूती भापकर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button