उन्नती सोशल फाउंडेशनकडून गरीब मुलांसमवेत ख्रिसमस साजरा
![Celebrate Christmas with poor children from Unnati Social Foundation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/WhatsApp-Image-2020-12-26-at-4.11.14-PM.jpeg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे पिंपळे सौदागर परिसरातील गरीब मुलांसमवेत ख्रिसमस सण साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
पांढरी दाढी आणि लाल कपड्यातला सांताकॉल्ज येतो आणि मुलांना भरपूर खाऊ, खेळणी देऊन जातो अशी गोष्ट मुलांना सांगितली जाते. त्यामुळे या प्रेमळ नाताळबाबाचे सर्वांना आकर्षण असते. पिंपळे सौदागर येथील बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी मात्र उन्नती फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे याच सांता च्या रूपात आल्याचे पहावयास मिळाले.
फाउंडेशनच्या माध्यमातून या मुलांना भेटवस्तू , खाऊ तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. या अनोख्या ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे ही मुले आनंदीत झाल्याचे दिसून आले. या विषयी बोलताना अध्यक्षा भिसे म्हणाल्या की, आपण साजरा करत असलेल्या सणाचा आनंद हा आपल्या आजुबाजूच्या गरीब मुलांना देखील मिळावा व त्यामुळे आपल्याही आनंदात भर पडावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.