उद्योगनगरीत तोतया आमदारांचा सुळसुळाट, अजित पवारांनी घेतली दखल, दादा-भाऊंचे कार्यकर्ते अडचणीत
![Ajit Pawar cancels decision to spend Rs 6 crore on social media](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/ajit-pawar.jpg)
- एकाही खुळपंचांगाला सोडणार नाही
- माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला इशारा
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये तोतया आमदारांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात याचे प्रमाण सर्वाधीक आढळते. ”आमदार” या नावाखाली त्यांची दहशत समाविष्ट गावांपासून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोचली आहे. आता या तोतया आमदारांचा लवकरच बंदोबस्त होणार आहे. कारण, याची दखल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. आमदारकीचा भास करुन फुटकळ प्रतिष्ठेपाई अशी भोगस उठाठेव करणा-या ‘खुळपंचागांना’ हिसका दाखविण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टीकर आपल्या मोटारीवर लावून पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक तोतया आमदार फिरु लागले आहेत. हे तोतये आमदार खऱ्या आमदारांचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी व्यक्त केला होता. तसेच, आपल्या प्रभागात (चिखली), मोशी, भोसरी येथे या बोगस आमदारांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे, असे साने यांनी म्हटले आहे. ते लोक राजमुद्रेचा गैरवापर करीत असून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी तत्कालीन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली होती. कारण, अशा तोतया आमदारांमुळे नागरिकांत गैरसमज पसरत आहे. या स्टिकरचा गैरवापर होण्याचीही शक्यता असून त्या बोगस आमदारांच्या मोटारी पालिकेपर्यंत पोचल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
निवडून आलेले आमदार विधानसभा सदस्य असा मजकूर असलेले स्टीकर मोटारीवर वापरू शकतात. विधानसभा वा मंत्रालयात सुलभ प्रवेश मिळणे हा उद्देश त्यामागे असतो. मात्र, काही आमदारांकडून हे स्टिकर्स आपल्या कार्यकर्त्यांना दिले गेले आहेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातूनच शिरूर (जि. पुणे) पोलिस ठाण्याने अशा स्टीकरचा बेकायदा वापर केल्याबद्दल एका तोतया आमदाराविरुद्ध गुन्हाही दाखल केलेला आहे. तदनंतरही, अशा बोगस आमदारांचा सुळसुळाट सुरूच आहे. ”महामार्गांवरील टोल शूल्कात सवलत आणि व्हीआयपी ट्रीटमेंट” मिळावी, या फुक्कटच्या उद्देशापोटी काही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आमदार असल्याचे स्टीकर स्वतःच्या खासगी मोटारीवर लावले आहे.
बोगसगिरी चालणार नाही – पवार
लाखो रुपये किंमतीची मोटार घेऊन खानदानी प्रतिष्ठा मिरवित निघालेला व्यक्ती 30-60-70 रुपये टोल शूल्कासाठी असा फालतूपणा करत असेल तर त्याला काय म्हणावे?. ज्या आमदारांकडून ते स्टीकर घेतले त्या आमदाराच्या प्रतिष्ठेला हा कलंकच म्हणावा लागेल, अशा कर्मट भावना समाजातून व्यक्त होत आहेत. शहरात तीन प्रतिष्ठीत आमदार असताना त्यांची प्रतिष्ठा कलंकीत करणा-या असंख्य तोतया आमदारांचा जन्म झाल्याचे प्रत्यक्षात पहायला मिळत आहे. याची तक्रार थेट अजित पवार यांच्याकडे झाली आहे. असा गैरवापर होत असेल तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एकाही व्यक्तीला सोडणार नाही, असा सज्जड इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. ते आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधीत करत होते.