आॅक्सिजन संपल्याने तरुणाचा मृत्यू ; पिंपरीतील डी.वाय.पाटील रुग्णालयातील घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/admission-guidance-for-dy-patil-medical-college-pune-500x500.jpg)
पिंपरी – संत तुकाराम नगर येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात पॅनक्रियाज आजाराच्या उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाचा ऑक्सिजन संपला. त्यानंतर देखील रुग्णालय प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे ऑक्सिजन अभावी 25 वर्षीय रुग्णाला प्राण सोडावे लागले. हा प्रकार बुधवारी (दि. 4) रात्री अकराच्या सुमारास घडला.
संदीप नवनाथ बनसोडे (वय 25, रा. आदर्श नगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप याची बहीण अलका बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपला मागील 12 दिवसांपूर्वी पिंपरी मधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात भरती केले होते. काल सकाळी डॉक्टरांनी सांगीतले की, आता संदीप बरा होत आहे. लवकरच त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर शिफ्ट करण्यात येईल. दुपारी डॉक्टरांनी त्याच्यासाठी ज्यूस देखील मागवला. पण सायंकाळी अचानक त्याचा एमआरआय करायचे ठरले. सायंकाळी चार वाजता पैसे भरले. रात्री नऊची वेळ मिळाली. पण प्रत्यक्ष एमआरआय साठी न्यायला अकरा वाजले.
रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून तळमजल्यावर घेऊन जात असताना संदीपचा ऑक्सिजन संपल्याचे आमच्या निदर्शनास आले. याबाबत डॉक्टरांशी बोलले असता, त्यांनी दुसरा ऑक्सिजन सिलेंडर मागवला. परंतु रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर शिल्लक नसल्याने तो मिळाला नाही. अर्ध्या तासानंतर थोडा ऑक्सिजन शिल्लक असलेला सिलेंडर मिळाला. परंतु त्यापूर्वीच संदीपचे शरीर निष्क्रिय झाले होते. हा सर्व प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे झाला आहे. असा आरोप अलका यांनी केला. आमचे पेशंट कोणत्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते, असे विचारत संदीपच्या कुटुंबीयांनी संबंधित डॉक्टरांना समोर आणण्याची मागणी केली आहे. बुधवारी रात्री अकरा वाजल्यापासून सर्व नातेवाईक रुग्णालय परिसरात बसले आहेत. त्यांनी संदीपचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले असता, पोलिसांनी आमचे तक्रार घेणारे अधिकारी त्याच रुग्णालयात गेले आहेत, असे सांगितले. नातेवाईकांनी रुग्णालयात चौकशी केली असता पोलीस चौकीमध्ये येऊन तक्रार द्या, असे सांगण्यात आले. एकंदरीत पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही अलका बनसोडे यांनी केला. याबाबत डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याचा संपर्क होवू शकला नाही.