आरोग्य तपासणी करुनच भाजीपाला विक्रीसाठी व्यावसायिकांना परवानगी द्यावी – संदीप काटे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/A-Gallery_37-2.jpg)
-प्रशासनाने सतर्क रहावे, नागरिकांनीही खबरदारी घ्यावी
-महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली मागणी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना (Covid 19) विषाणुचा विळखा तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. सोशल डिस्टंन्सिंग अमलात आणण्यासाठी मोकळ्या जागेत भाजी मंडई सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेतला. अशा ठिकाणी पालेभाज्या विक्रिसाठी ग्रामीण भागातील व्यापारी, छोटे-मोठे व्यवसायिक येणार असून त्यांच्याशी अनेक व्यक्तींचा संपर्क आलेला असतो. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून शहरात पालेभाज्या विक्री करण्यासाठी येणाऱ्या व्यावसायिकांची आरोग्य तपासणी करुनच त्यांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्या ठिकाणी भाजी मंडई सध्या कार्यान्वित आहे. त्या ठिकाणच्या नजिकच्या मोकळ्या जागी भाजी मंडई सोशल डिस्टंन्सिंगचा अंमल प्रभावीपणे करता येईल, अशा ठिकाणीच सुरू केली जाणार आहे. मात्र, जागा निश्चित झाल्यानंतरच सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत भाजी विक्री सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोकळ्या जागांची तातडीने पाहणी करून ती जागा भाजी मंडई सुरू करण्यासाठी निश्र्चित करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजी मंडई सध्या अस्तित्वात आहे, तेथे भाजी विक्री सुरू करता येणार नाही. फिरत्या हातगाड्यांबाबत मात्र स्वतंत्र आदेश नंतर निर्गमित करण्यात येणार आहेत. त्यामुळे फिरत्या हातगाड्यांवर भाजी विक्री तथा फळ विक्री करता येणार नाही. शिवाय इतर छोट्या टप-या अथवा भाजी केंद्रांवर देखिल भाजी अथवा फळ विक्री सुरू करता येणार नाही, असे सक्त आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
या आदेशाचे स्वागतच आहे. परंतू, पालिका प्रशासनाने भाजी विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेत ग्रामीण भागातून व्यापारी, छोटे-मोठे व्यवसायिक येणार आहेत. त्यांच्या संपर्कात असंख्य व्यक्ती येतात. शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता या व्यापारी व व्यावसायिकांची कोरोना संसर्ग निर्मुलनाच्या दृष्टीकोनातून तपासणी होणे गरजेचे आहे. भाजीपाला विक्रीची ठिकाणे निश्र्चित झाल्यानंतर त्याठिकाणी येणाऱ्या व्यावसायिक, विक्रेत्यांना तपासणी केल्यानंतरच भाजी विक्रिसाठी परवानगी देण्यात यावी. त्यानंतर सोशल डिस्टंसिंग अमलात आणून पोलीस संरक्षणात नागरिकांसाठी पालेभाज्या, फळे, धान्य खरेदी करण्याची शिस्तबध्द योजना आखावी. तरच, आपण कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यात यशस्वी होणार आहोत, असेही संदीप काटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना प्रसिध्दी पत्रकाद्वारे सूचित केले आहे
जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडताना मास्कचा आवश्य वापर करावा. निर्जंतुकीकरणासाठी सेनिटायझर जवळ बाळगावे. विशेष म्हणजे, सोशल डिस्टंन्सिंग ठेवूनच कोणतेही काम करावे. प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे.
कार्यकर्ते संदीप काटे, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस