breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार जगताप, लांडगे आणि मंत्रीपदाचा “फुसका बार”

  • दसरा-दिवाळी झाली तरी भाजपचे प्रदेश नेतृत्व थंडच
  • विस्ताराची यादी तयार नसल्याने वातावरण निराशाजनक

अमोल शित्रे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधून राष्ट्रवादीला उखडून फेकण्यासाठी भाजप प्रदेश नेतृत्वाच्या शब्दाखातर पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आळंदीसारख्या नगरपालिकेवर आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या अथक प्रयत्नाने कमळ फुलले. तत्पुर्वी, प्रदेश नेतृत्वाने दोन्ही नेत्यांना मंत्री पदाचा शब्द दिला होता. मंत्रीमंडळाचा चार वर्षाचा कार्यकाळ संपला तरी राज्य सरकारकडून अद्याप विस्ताराची पुंगीच वाजविली जात आहे. दसरा-दिवाळी झाली तरी अद्याप मंत्री पदाची यादी तयार नाही. सरकारच्या उर्वरीत कार्यकाळात तरी “भाऊ” आणि “दादां”च्या माध्यमातून उद्योगनगरीच्या माथ्यावर मंत्री पदाचा शिक्का बसणार की, हा दिवाळीचा “फुसका बार” ठरणार, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनातून साशंकता व्यक्त होत आहे.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना मावळ लोकसभा भाजपच्या तिकीटावर लढवायची आहे. प्रचाराचा शुभारंभही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विराट सभेच्या साक्षीने निगडी प्राधिकरणात केला. याचा अर्थ युती न झाल्यास मावळ लोकभेसाठी भाजपचे तिटीक शंभर टक्के आपल्यालाच मिळणार, येवढा प्रबळ आत्मविश्वास त्यांच्या ठायीठायी भरलेला दिसतो. मात्र, “आरएसएस”च्या सत्ताधारी भाजप नेतृत्वांनी महापालिका निवडणुकीपूर्वी मंत्री पदाचा दिलेला शब्द पाळला नाही, ते लोकसभेचे तिकीट काय देणार?, त्यामुळे भाऊंची घोर निराशा होणार, असा अंदाज कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. याचा अर्थ भाऊंना मावळ लोकसभेसाठी भाजपचे तिकीटही मिळणार नाही, असे कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे. म्हणजेच राज्यातील भाजप नेतृत्वाबाबत भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये अविश्वास निर्माण झाल्याचे दिसते.

आमदार महेश लांडगे यांनी देखील महापालिका निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून भाजपचे जवळपास 35 नगरसेवक निवडून आणले. शिवाय, आळंदी नगरपालिकेवर दादांनी भाजपची सत्ता आणली. वास्तविकतः हा प्रांत दादांच्या विधानसभा मतदार संघात येत नसला तरी, दादांनी पक्षासाठी आणि राज्य सरकारमधील भाजप नेतृत्वाला दिलेल्या शब्दासाठी दखल घेऊन नगरपालिकेवर कमळ फुलविले. उभ्या देशाला मोदी लाटेचा विळखा पडलेला असताना दादांनी भोसरीचा गड स्वबळावर आजमावला. तरीही, दादांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आळंदी नगरपालिकेवर पक्षाची सत्ता आणण्यात मोलाचे योगदान दिले. तथापि, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री पदाची अपेक्षा काही केल्या पूर्ण केली नाही. त्यामुळे येवढे दिवस भाजपच्या बाजुने फिरलेले वातावरण आता पक्षाच्या विरूध्द दिशेला घोंघावताना दिसत आहे. तसेच, दादांना विधानसभेला पक्षाच्या बळाची गरज नाही, त्यांच्या पैलवानी नेतृत्वाने भोसरीतील संबंध तरुणांना भुरळ घातली आहे. एवढेच नव्हे, तर गेल्या चार वर्षातील त्यांचे काम, त्यांनी मोठी केलेली माणसे हा इतिहास भोसरीकरांच्या डोळ्यासमोर आहे. उलट यात भाजपचेच नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा भोसरीतील गावकट्ट्यावरील जाणकार लोकांमध्ये केली जात आहे.

प्रदेश नेतृत्वाबाबत कार्यकर्ते नाराज

गणेश विसर्जन झाल्यानंतर मंत्री मंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा भाजपच्या नेत्यांनी राज्यभरात चालविली. विसर्जन होऊन अवकाश झाल्यानंतरही विस्ताराचा पत्ता नाही. त्यानंतर दसरा झाल्यानंतर विस्तार चार-दोन दिवसातच होईल, असे सांगण्यात आले. दसरा होऊन आता दिवाळी झाली. तरीही, राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार काही केल्या होताना दिसत नाही. मुळात सरकारमधील भाजपच्या कट्टर आरएसएस नेतृत्वालाच विस्ताराबाबत अस्था राहिली नसल्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. मंत्री पदाची आश्वासने देऊन गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आणली. हे आश्वासन म्हणजे दिवाळीचा फुसका बार ठरतो की काय, असा संशय कार्यकर्त्यांना सताऊ लागला आहे. अद्याप यादी देखील तयार नसून यादीमध्ये भाऊ आणि दादांच्या नावाचा साधा उल्लेख जरी केला, तरी पिंपरी-चिंचवडकर आनंदातच डुबून जातील. परंतु, तसे वातावरण नसल्यामुळे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते चिंतेत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button