आगामी निवडणुकांसाठी युवक काँग्रेसचा ‘सुपर १०००’ उपक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/IMG-20201207-WA0009.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
महापालिका निवडणुकीसाठी युवक काँग्रेसकडून राज्यभर “सुपर १०००” उपक्रम राबविण्यात येणार असल्याची व यातून १००० युवकांना संधी उपलब्ध होणार असल्याची माहीती पिंपरी-चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेसचे निरिक्षक प्रदीप सिंधव यांनी दिली.
सुरूवातीला भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व पदाधिका-यांनी भीमसृष्टी येथील डाॅ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला.
पिंपरी-चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसची बैठक पिंपरी येथे एका हाॅटेलात पार पडली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सचिव दादासाहेब काळे, अक्षय जैन, कौस्तुभ नवले व उमेश पवार आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधव म्हणाले, “युवक काँग्रेस महाराष्ट्रामध्ये सुपर १००० उपक्रम राबविणार आहे, यामध्ये बूथ यंत्रणेपर्यंत संपर्काचे जाळे सक्षमपणे उभारणा-या सुमारे १००० युवकांच्या कामांचे निरिक्षण करून त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबविताना विशिष्ट पध्दतीचा अंवलब करून देण्यात येणार आहे”.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे म्हणाले, “सध्या जगाभरात गाजलेले कृषी विधेयकाविरोधी शेतकरी आंदोलन, उच्चांकी बेरोजगारी, महागाई, अत्याचाराच्या घटना, इंधनदरात वारंवार होत असलेली वाढ या व इतरही केंद्रातील मोदी सरकारच्या चूकीच्या व अन्यायकारक धोरणामुळे देशातील नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. या परिस्थितीत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरी प्रश्नावर अधिकाधिक आंदोलने करत सामान्यजणांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी आगामी काळात नागरी सहभागातून जनआंदोलने उभारली गेली पाहीजेत. जनतेला काँग्रेस पक्षाकडून असलेली अपेक्षा पूर्ती झाली पाहीजे, ”.
याप्रसंगी शहर युवक काँग्रेस पदाधिका-यांनी निरिक्षकांकडे आपली मते व प्रश्न व्यक्त केले. यावर समाधानकारक संवाद साधत सिंधव यांनी पुढील कामाला सुरूवात करण्याबाबत सुचना दिल्या. या प्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, जिल्हा सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, स्वप्निल बनसोडे, दिपक भंडारी, गौरव चौधरी, अनिल सोनकांबळे, सौरभ खरात, पांडूरंग वीर, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, उपाध्यक्ष सौरभ शिंदे, प्रविण जाधव, रोहन वाघमारे आदी पदाधिकारी व बहूसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.