अ प्रभागातील झोपडपट्टींच्या मुलभूत समस्या सोडविणार – महापाैर राहूल जाधव
पिंपरी – महापालिकेच्या ‘अ’ प्रभागात इतर प्रभागाच्या तुलनेत अधिक झोपडपट्ट्यांचा भाग आहे. या प्रभागातील पाणी, कचरा, आरोग्याविषयी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करु , असे आश्वासन महापाैर राहूल जाधव यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहराचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे ‘अ’ प्रभागाच्या सभेला उपस्थित राहिले. त्यानिमित्त प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी महापौर, उपमहापौरांचा सत्कार केला. माजी उपमहापौर शैलजा मोरे, राजू मिसाळ, नगरसेवक अमित गावडे, जावेद शेख, शितल शिंदे, प्रमोद कुटे, शैलेश मोरे, केशव घोळवे, नगरसेविका वैशाली काळभोर, शर्मिला बाबर, कोमल मेवाणी, स्वीकृत सदस्य राजू सावंत यांच्यासह पाणीपुरवठा, स्थापत्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे म्हणाल्या, इतर प्रभागाच्या तुलनेने अधिक झोपडपट्ट्यांचा भाग हा ‘अ’ प्रभागाच्या कार्यक्षेत्रात येतो. तेथे पाणी, वीज आणि स्वच्छताविषयक चांगल्या सोयी, सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठी महापौरांनी आम्हाला सहकार्य करावे.
त्यावर महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘अ’ प्रभागात झोपडपट्टीचा भाग अधिक आहे. त्यातुलनतेच प्रभागातील नागरिकांना अधिकच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. प्रभागातील कामासाठी आवश्यक मदत करण्यास आपण तयार आहोत. पाणी, कचरा हे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.