अबब…फाइल ठेवण्यासाठी 12 कोटीचे अद्यावत मशिन खरेदीचा घाट !

– भांडार विभागाकडून अद्ययावत मशिन खरेदीचा घाट
पिंपरी, ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमध्ये केवळ फायली ठेवण्यासाठी बारा कोटींचे अद्ययावत “ऍडव्हान्स डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टिम’ मशिन खरेदी करण्याचा घाट भांडार विभागाकडून घालण्यात येत आहे. या विभागांत फायली ठेवण्यासाठी नवे कोरे फर्निचर गेल्या एक-दोन वर्षांपूर्वीच बनविले आहे. आता मशिन खरेदीवर मोठा खर्च करण्याची तयारी सुरू झाली आहे.
महापालिकेच्या भांडार विभागाकडे या मशिनसाठी चार निविदा आल्या होत्या. एकाच व्यक्तीने तीन वेगवेगळ्या नावाने निविदा भरल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात रंगली आहे. महापालिकेतील प्रत्येक विभागाच्या अभिलेख कक्षासाठी तसेच आठ क्षेत्रीय कार्यालयांमधील बांधकाम, आरोग्य, विद्युत, माहिती व जनसंपर्क, पर्यावरण, वैद्यकीय, अतिक्रमण, उद्यान, पाणीपुरवठा, लेखा विभाग अशा विविध विभागांसाठी 50 मशिन खरेदी करण्यात येणार आहे. एक मशिन सुमारे 24 ते 25 लाखांना खरेदी करण्यात येत आहे. महापालिकेत शुक्रवारी मशिन दाखविण्यासाठी आणले होते. हे मशिन संगणकाच्या साह्याने वापरले जाईल.
महापालिकेत सुरू असलेल्या चर्चेनुसार या मशिन खरेदीसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. त्यासाठी अर्थसंकल्पात हेडही नाही. त्यामुळे या खरेदीसाठी निधी कोठून उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाचे गेल्या वर्षी नूतनीकरण करून नवे कोरे फर्निचर केले आहे. त्या फर्निचरचे काय करायचे, हाही प्रश्न निर्माण होणार आहे. कर्मचारी किंबहुना अधिकारी एखादी फाइल शोधू शकतात. जी कामे कर्मचारी करू शकतात, त्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्चून मशिनची गरजच काय?, असे प्रश्न विचारले जात आहेत.
“”या मशिनमध्ये मेकॅनाइज ऑटोमॅटिकही डॉक्युमेंट स्टोअरेजसाठी जागा आहे. मशिनद्वारेच त्यावर नियंत्रण ठेवले जाते. अभिलेख विभागाने या मशिनची गरज असल्याचे भांडार विभागाला कळविले. सध्या 50 मशिन मागविल्या आहेत. त्याला सॉफ्टवेअरचा खर्च येत नाही. मात्र, हार्डवेअरचा खर्च येऊ शकतो. महापालिका भवनाच्या तळ मजल्यावर मशिनसाठी जागा उपलब्ध केली आहे.”
– डॉ. प्रवीण आष्टीकर, सह आयुक्त भांडार विभाग महापालिका





