… अन् पिंपरीच्या राष्ट्रवादी आमदारांमुळे वाचले शेकडो रुग्णांचे प्राण
![Begin to return the deposit to those who did not appear in the draw in the Prime Minister's Housing Scheme; Success to MLA Anna Bansode's demand](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/4anna_bansode.jpg)
आयुक्त श्रावण हर्डिकर यांनीही तत्परता दाखवून ऑक्सिजन सिलेंडरचा केला पुरवठा
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
आकुर्डी येथील कोविड रुग्णांसाठी स्टार हॉस्पिटलमधील ऑक्सिजन सिलेंडरचा साठा बुधवारी मध्यरात्री अचानक संपुष्टात आला. सिलेंडरचा पुरवठा तात्काळ होणे आवश्यक असताना अनेक अडचणींना हॉस्पिटल प्रशासनाला सामोरे जावे लागले. मात्र, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आमदार अण्णा बनसोडे यांनी सतर्कता दाखवत मध्यरात्री सूत्रे फिरवत हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरविला. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाबरोबर 60 ते 70 रुग्णांनाही दिलासा मिळाला.
याबाबत स्टार हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित वाघ यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल पिंपरी चिंचवड महापालिकेने कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित केले आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये 95 रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या दररोज कमीत कमी 110 ते 120 इतक्या ऑक्सिजन सिलेंडरची गरज असते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/mla-bansode.jpg)
बुधवारी मध्यरात्री हॉस्पिटलमधील ऑक्सिजन सिलेंडरचा साठा संपुष्टात आला. सिलेंडरचा पुरवठा तात्काळ होणे आवश्यक असताना अनेक अडचणींना हॉस्पिटल प्रशासनाला सामोरे जावे लागले. रात्री एकच्या सुमारास तातडीने सिलेंडर मिळणे अशक्य होते. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने आम्ही थेट त्यांचे घर गाठले. कारण प्रश्न रुग्णांच्या जीव वाचाविण्याचा होता. एकीकडे आयुक्तांशी संपर्क करत असताना दुसरीकडे आमदार अण्णा बनसोडे यांना देखील आमची अडचण सांगितली. त्यांनीही याबाबत प्रयत्न सुरु केले.
आयुक्त हर्डीकर यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम ) हॉस्पिटलमधून तात्पुरत्या स्वरूपात सिलेंडरचा पुरवठा तात्काळ आम्हाला करता येईल का, याची चाचपणी केली. तात्पुरत्या स्वरूपात सिलेंडरचा पुरवठा आम्हाला देता येईल याची खात्री झाल्यानंतर त्यांनी परवानगी दिली. आम्ही ही बाब आमदार बनसोडे यांच्या कानावर घातली. वायसीएममधून सिलेंडर आमच्या ताब्यात देईपर्यत पहाटे चार वाजेपर्यंत आमदार बनसोडे आमच्या सोबत होते. अखेरीस वीस ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा आमच्या हॉस्पिटलला करण्यात आला आणि आमचा जीव भांड्यात पडला, असे डॉ. वाघ यांनी सांगितले.