अत्याचारग्रस्त मुलींवर उपचार नाकारला ; वायसीएमच्या डाॅक्टरांचे कृत्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/IMG-20181004-WA0019.jpg)
राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसचा वैद्यकीय अधिक्षकांना घेराव
संबंधितावर कडक कारवाईची मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – अत्याचारग्रस्त मुलींला वायसीएम रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांच्या सांगण्यावरुन अत्यावश्यक सेवेतील सीएमआे डाॅक्टरने उपचार नाकारला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसने आज (गुरुवार) दुपारी दोन वाजता वैद्यकीय अधिक्षक मनोज देशमुख, अतिरिक्त वैद्यकीय संचालक डाॅ.पवन साळवे यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला. तसेच उपचार नाकारणा-या सीएमआे डाॅक्टरवर कडक कारवाईची मागणी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या शहराध्यक्ष व नगरसेविका वैशाली काळभोर यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना भेटून करण्यात आली.
बिजलीनगर (चिंचवड) येथील एका तीन वर्षीय मुलींवर अत्याचार झाला होता. त्यानंतर त्या मुलींवर उपचार करण्यासाठी नातेवाईकांनी सदरील मुलींला मंगळवारी (दि.2) महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा विभागात रात्री साडेनऊ वाजता आणले. परंतू, तेथील सीएमआे तुषार रजपूत यांनी त्या अत्याचारग्रस्त मुलींवर उपचार करण्याएेवजी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. मनोज देशमुख यांना फोन लावून उपचार करण्याबाबत विचारणा केली. मात्र, सदरील मुलींला ससून रुग्णालयाकडे पाठवून द्या, वायसीएम रुग्णालयात उपचार करु नका, असा सल्ला दिला. त्यावरुन त्यांनी मुलींंचा केस पेपर न काढता केवळ एका कागदावरुन हस्ताक्षरात लिहून त्या मुलीला ससून रुग्णालयाकडे पाठवून दिले.
दरम्यान, अत्याचारग्रस्त तीन वर्षीय मुलींवर उपचार न केल्याने शहर राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी) आंदोलन करण्यात आले. तसेच वायसीएम रुग्णालय प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच अत्याचारग्रस्त मुलींवर उपचार नाकारणा-या डाॅक्टरावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अत्याचारग्रस्त मुलीवर उपचार नाकारणा-या डाॅ. तुषार रजपूत यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, तसेच त्यांना कामावरुन काढण्यात येईल, असे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे यांनी सांगितले.