अजितदादा, भ्रष्ट – निष्क्रीय आयुक्तांची तत्काळ उचलबांगडी करा
![PCMC commissioner Shravan Hardikar promoted to the same post](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/PCMC-chief-Shravan-Hardikar-1200.jpg)
सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांना निवेदन
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने वाढू लागला आहे. दररोज शेकडो रुग्ण हे पाॅझिटिव्ह येत आहे. शहराची परिस्थिती हाताळण्यात महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना अपयश आले आहे. त्यातच लाचखोर अधिका-यांना पाठिशी घालून कारवाईस चालढकल करु लागले आहेत. अशा भ्रष्ट, निष्क्रीय आयुक्तांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. शहरातील रुग्णसंख्या ७ हजार २७६ वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत बाधित रुग्णांची संख्या रोज ५०० च्या वर जावू लागली आहे. प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करुनही कोरोना महामारी आटोक्यात आणण्यात अपयश येवू लागले आहे.
कोरोना महामारीच्या काळातही विविध निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार सुरु आहे, एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे महापालिकेची तिजोरी रिकामी पडू लागली आहे. वैद्यकीय साहित्य व उपकरण खरेदीतील लाचखोर अधिका-यावर कारवाई अद्याप झालेली नाही. डाॅक्टराची अपुरी संख्या असूनही कोविड सेंटरची जबाबदारी काढून प्रशासकीय जबाबदारी सोपविली जात आहे.
कोरोनाच्या लढाईत विविध निविदा प्रक्रियेच्या खरेदीत भ्रष्टाचार होत आहे. आयुक्तांनी पीपीई कीट, जेवण खरेदी व्यवहारात जो घोळ झाला. मास्क खरेदी दीड कोटींची त्यात १० रुपये प्रमाणे १५ लाख खरोखरच खरेदी झाले की नाही इथपासून शंका आहे. वैद्यकीय विभागाने खरेदी केली त्यात ५० लाखाचे मशिन १.५० कोटींला खरेदी केले असे ढळढळीत दिसते. ठेकेदारांनी अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात दलाली (लाच) जमा केल्याचे पुरावे प्रशासनाला देऊनही आयुक्तांकडून कारवाईत करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना आयुक्त पाठिशी घालत आहेत. त्यामुळेच निष्क्रिय आयुक्त श्रावण हार्डिकरांची बदली करून त्यांच्या जागी चांगल्या व कार्यक्षम आयुक्तांची पिंपरी चिंचवड शहराला, महापालिकेला गरज आहे. शहरातील लॉकडाऊन संपताच तात्काळ आयुक्त श्रावण हर्डिकरांची बदली करण्यात यावे, असे म्हटले आहे.
… हर्डिकरांवर एवढं प्रेम का?
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रशासनावर मजबूड पकड आहे. एखाद्या भ्रष्ट, निष्क्रीय, कामात कुचराई करणारा अधिकारी दादांच्या नजरेतून कधीच निसटत नाही. त्यात पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, सोलापूर महापालिका आयुक्त दीपक तावरे यासह अन्य अधिका-यांच्या अचानक तडकाफडकी बदली करण्यात आला. मग पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यावर कोणाचं, एवढं प्रेम ऊतू चाललंय की, तीन वर्षे कार्यकाळ संपूनही अजून त्यांची बदली होत नाही. आजपर्यंत सत्ताधारी भाजपने महापालिका तिजोरी लुटून खाल्ली, चुकीच्या कामांना मुभा दिली. भ्रष्ट अधिका-यांना पाठिशी घातले. तरीही आयुक्तांची बदली होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.