अग्नीशामक विभागातील दोघांची खातेनिहाय चाैकशीचे आदेश – आयुक्त हर्डिकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/1-2.jpg)
पिंपरी – शहरातील बांधकामास अग्नीशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे सब ऑफिसर आणि फायरमनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
सब ऑफिसर उदय माधवराव वानखेडे (वय 52, रा. मदन मोहन हौसिंग सोसायटी, कामगार नगर, पिंपरी) आणि फायरमन अनिल सदाशिव माने (वय 32, रा. शुभारंभ कॉलनी काळे कॉलनी आळंदी) असे निलंबित करण्यात आलेल्या सब ऑफिसर, फायरमनचे नाव आहे.
तक्रारदार यांचे वाकड सर्व्हे क्र 186 येथे बांधकाम चालू होते. बांधकामाचे फायर ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी तक्रारदार यांनी अग्निशामक केंद्र येथे प्रकरण दाखल केले होते. त्यासाठी वानखेडे यांनी प्रोव्हिजनल फायर ना हरकत प्रमाणपत्राची फाइलची पूर्तता करून वरिष्ठांकडे पाठविली होती. तक्रारदाराला त्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र देखील दिले होते. परंतु, या मोबदल्यात वानखेडे आणि माने यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रुपये लाच देण्याची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाक (एसीबीकडे) तक्रार दिली होती. 19 मे रोजी तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना वानखेडे, माने यांना लाच लुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहाथ पकडले होते.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 56(1) व 56 (2) (फ) मधील तरतूदींच्या अधिन महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 च्या नियम 4 (1) (अ) व (क) मधील तरतूदीनुसार वानखेडे व माने यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. निलंबनाच्या काळात अटी व शर्तीच्या अधिन राहून त्यांना निर्वाह भत्ता अदा करण्यात येणार आहे.