…अखेर पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसचे जहाज बुडाले!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/congress-sinking-ship1.png)
- शहराध्यक्ष सचिन साठे यांचा प्रदेश नेतृत्वाकडे राजीनामा
- राष्ट्रवादीच्या खेळीने कॉंग्रेसला शहरात सुरूंग
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील असह्य पराभवानंतर विदारक परिस्थितीचा सामना करत कॉंग्रेसची वाटचाल कशीबशी सुरू होती. एका एका कार्यकर्त्याला बळ देऊन शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पक्षवाढीसाठी जीवाचे राण केले. मात्र, त्यांना प्रदेश पातळीवरून म्हणावे तसे पाठबळ मिळाले नाही. प्रदेश नेतृत्वांचेच वारीष्ठ स्तरावर राजकीय लागेबांधे कायम राहिल्याने राष्ट्रवादीच्या दबावाखाली राहून काम करण्याची वेळ शहरातल्या सामान्य कार्यकर्त्यांवर आली. कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाचे गुलाम म्हणून वागू लागल्याने कधीकाळी तोळामासा उरलेल्या कॉंग्रेसचे जहाज अखेर आज बुडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रा. रामकृष्ण मोरे यांनी कॉंग्रेसचे नेतृत्व करताना सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांचे करिअर घडवले. आज शहरात विविध पक्षांचे नेतृत्व करत असणारे बहुतेकजण मोरेसरांच्या तालमीत तयार झालेले आहेत. कॉंग्रेसमध्ये राहिलेले आणि कॉंग्रेसमधून बाहेर पडून अन्य पक्षात चांगले करिअर करणारे नेतेदेखील खासगीत बोलताना दिवंगत सरांचे ऋण मान्य करतात. मोरे सरांच्यानंतर येथील राजकारणाची सुत्रे राष्ट्रवादीचे कारभारी अजितदादा पवार यांच्या हाती गेली. आणि त्यांनी पध्दतशीरपणे मोरे समर्थक आणि कॉंग्रेसनेत्यांना कुजवण्याची प्रक्रिया सुरी केली. त्याला कंटाळून अनेक कॉंग्रेसजन अन्य पक्षात स्थलांतरीत झाले. तिथे जाऊन त्यांनी खासदार, आमदार व सत्तेची ऊब मिळवली. दरम्यान, कॉंग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी पिंपरी-चिंचवडकडे कधीच बारकाईने लक्ष देण्याची भूमिका घेतली नाही. मधल्या काळात कधी सुरेश कलमाडी यांनी तर कधी हर्षवर्धन पाटील यांनी लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तर पक्षाची स्थिती आणखीनच खालावली. पुण्याची स्थिती काहीअंशी बरी वाटत असली तरी पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र पक्षाला किमान ताकदीचे नेतृत्व सापडले नसल्याने कार्यकर्ते दिशाहीन झाले.
2003 पर्यंत पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा कॉंग्रेसने आपल्याकडे ठेवली होती. मात्र, प्रा. मोरे सरांचे निधन झाल्यानंतर ही जागा सासवडच्या चंदुकाका जगताप यांच्याकडे गेली. त्यानंतर दस्तुरखुद्द कारभारी अजितदादा यांनी ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी लक्ष्मण जगताप यांना पुढे केले. तेव्हा या जागेवर कॉंग्रेसचे चिंचवड येथील भाऊसाहेब भोईर यांनीही दावा केला होता. तशी मागणीही त्यांनी तत्कालीन प्रदेश नेतृत्वाकडे केली होती. मात्र, प्रदेश नेतृत्वाने बेरजेचे राजकारण केल्यामुळे भोईर यांची डाळ शिजली नाही. शेवटी ही जागा जगताप यांच्या रुपाने राष्ट्रवादीकडे राहिली. तेव्हापासून भोईर पक्षावर कमालीचे नाराज होते. या जागेसाठी त्यांनी आपला स्वतंत्र गट घेऊन फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे जाहीर करत पक्षनेतृत्वावर दबावतत्रांचा वापरही केला होता. तरीही, नेतृत्वाने त्यांच्या भावना समजून घेतल्या नाहीत. शेवटी महापालिका निवडणुकीच्या (2017) तोंडावर भोईर यांनी आपल्या नऊ नगरसेवकांसह राष्ट्रवादीत लॅण्डींग केले. त्यानंतर कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदाची सुत्रे सचिन साठे यांच्या हाती गेली. कार्यकर्त्यांनी साठे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढली. मात्र, दुर्दैवाने पक्षाचा एकही नगरसेवक या निवडणुकीत निवडून आला नाही. तेव्हापासून शहरात पक्षाची वाताहत सुरू झाली.
शहराध्यक्ष साठे यांनी कधिकाळी कॉंग्रेसचा हा किल्ला राखून ठेवण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले. मात्र, पक्षाचे तुकडे झाल्यानंतर नेतृत्व हाती आल्याने साठे यांचा करिष्मा कार्यकर्त्यांना भावला नाही. त्यातच कामगार नेते म्हणून स्वतःला प्रमोट करणारे कैलास कदम यांच्याही भूमिकेचा फटका काहीअंशी पक्षाला तर बहुतांशी साठे यांच्या प्रतिमेला बसला. त्यामुळे विस्वासू कार्यकर्ते दुरावले गेले. दुभंगलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणणे साठे यांना जमले नाही. परिणामी, पक्षाची ताकद एवढी खालावली गेली की, पिंपरी चौकातील आंदोलनाची इभ्रत शाबूत राहील, एवढे कार्यकर्ते देखील पक्षात उरले नाहीत. सर्वांनीच पाठ फिरविल्याने साठे यांचेदेखील मनोधैर्य कालांतराने खचून गेले. पक्षाकडे कार्यालयाचे भाडे देण्याएवढी सुध्दा आर्थिक परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे त्यांना चिंचवड येथील पक्षकार्यालय सोडावे लागले. तेथून संत तुकारामनगर येथील एकाच्या घरात हे कार्यालय कसेबसे सुरू केले. मात्र, या कार्यालयात बसायला देखील कार्यकर्ते उरले नाहीत. काही दिवसांनी तर साठे यांनी सुध्दा या कार्यालयात येण्याचे सोडून दिले. शेवटी पक्षाच्या अपयशाचे खापर दुस-याच्या माथ्यावर न फोडता, त्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे रितसर राजीनामा देऊन औपचारिकता अबाधीत ठेवली आहे.
राजकीय लागेबांधे असल्यामुळे नेत्यांनी संपर्क तोडला
पुण्यात जशी कॉंग्रेस मजबूत होती. तशी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या कार्यकाळात होती. त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी स्थानिक राष्ट्रवादीसोबत आर्थिक हीत जोपासल्याने पक्षाचा एकही नेता मोरे सरांच्यानंतर पक्षवाढीसाठी सक्रीय राहिला नाही. सुरेश कलमाडी, हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरासाठी वेळ दिला नाही. राष्ट्रवादीचे अजितदादा आणि त्यांच्यासोबतच्या आर्थिक समिकरणात अडकल्याने कधीकाळीचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेले पुणे आणि पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे बालेकिल्ले बनले. अगदी थोडक्या काळात राष्ट्रवादीने कॉंग्रेसला शहरातून हद्दपार केले आहे. त्यामुळेच मोरे सरांच्यानंतर निष्ठेने काम करणा-या कार्यकर्त्यांचा राजकीय बळी जाऊ लागला. त्याकारणाने आज शहरात कॉंग्रेसचा एकही निष्ठावंत औषधाला उरलेला नाही. त्यामुळे साठे यांच्यानंतर शहराध्यक्ष पदासाठी सक्षम चेह-याचा शोध घेण्याची वेळ कॉंग्रेसवर आली आहे.