breaking-newsपिंपरी / चिंचवड

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला बुधवारी सुरूवात

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीचे वेळापत्रक सोमवारी जाहीर झाले. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बुधवारी (दि. १२) सुरुवात होणार आहे. पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी ३० ऑगस्टला जाहीर होणार आहे.

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरात ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांत १ लाख ६ हजार ८१२ जागा उपलब्ध आहेत. त्यातील सर्वाधिक जागा विज्ञान शाखेत (४६ हजार ९८१) आहेत. आत्तापर्यंत सुमारे ९० हजार ६४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६१ हजार ८८३ जणांनी अर्जाचा पहिला भाग भरून अर्ज अंतिम केला आहे. तर ३० हजार १२० विद्यार्थ्यांच्या अर्जाची संगणकीय पडताळणी आणि २३ हजार ४१० विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यात आली आहे.

आता प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून पहिल्या फेरीत प्रवेश घेता येणार असल्याची माहिती केंद्रीय अकरावी प्रवेश नियोजन समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली. पसंतीक्रम आणि राखीव जागांवरील (कोटा) प्रवेशासाठी १२ ते २२ ऑगस्टदरम्यान शून्य फेरी राबवली जाईल. पहिल्या नियमित फेरीसाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवता येतील. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरता येईल. विद्यार्थ्यांची अर्ज पडताळणी मार्गदर्शन केंद्र आणि माध्यमिक शाळांमध्ये सुरू राहील.

विद्यार्थ्यांनी पहिला पसंतीक्रम भरलेल्या महाविद्यालयात प्रवेश बंधनकारक आहे. पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास विद्यार्थी नियमित फेऱ्यांतून बाहेर पडेल. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाला विनंती करून प्रवेश रद्द करता येईल. प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विशेष फेरीची वाट पाहावी लागेल, असे प्रवेश समितीने स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button