breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

#PhoneTapping: “…त्यामुळे आमचे फोन अवैधपणे टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता”; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप!

मुंबई |

बेकायदा फोन टॅपिंग केल्या प्रकरणी काल (शनिवार) पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, आता या मुद्य्यावरून सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजपा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधणं सुरू केलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपही केला आहे. शिवाय, तत्कालीन गृहमंत्री या नात्याने फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी केली जावी, अशी देखील मागणी केली आहे. “फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे. त्यामुळे आमचे फोन अवैधपणे टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता. तत्कालीन गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे.” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट्द्वारे म्हटलं आहे. तसेच, नाना पटोले यांनी ट्वीट सोबत फोन टॅपिंगसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या काय सूचना आहेत, हे देखील एका माहितीपत्रकाद्वारे आपल्या ट्वीटमध्ये दर्शवलं आहे.

भारतीय तार अधिनियम कलम २६ अनुसार रश्मी शुक्ला तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती काल पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी दिली. शुक्ला सध्या हैदराबाद येथे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागात (स्टेट इंटिलिजन्स डिपार्टमेंट-एसआयडी) आयुक्त होत्या. त्यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती.

उच्चस्तरीय समितीचा अहवाल शासनाने स्वीकारून फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच दिले. शुक्ला यांनी पुण्यातील कार्यकाळातही पदाचा गैरवापर करून बेकायदा अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • रश्मी शुक्लांबाबत कारवाईसाठी कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करू- गृहमंत्री वळसे पाटील

रश्मी शुक्ला यांनी ज्या फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली त्यामध्ये व्यक्तींची नावे बदलून दुसऱ्या नावांची परवानगी घेण्यात आली. ज्यामध्ये नाना पटोले – अमजद खान, बच्चू कडू – निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे – तरबेज सुतार, आशिष देशमुख – रघु चोरगे अशाप्रकारची नावे देण्यात आली. सखोल चौकशी केल्यानंतरच रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा सरकारी अधिकाऱ्याने आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता चुकीच्या पद्धतीने कृती केली तरी त्या व्यक्तीला शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षा केली जाते. रश्मी शुक्ला या सध्या सेंट्रल डेप्युटेशनवर कार्यरत असल्याने त्यांच्या संदर्भात नेमकी काय कारवाई करण्यात येईल याची कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करू, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

  • प्रकरण नेमके काय?

फोन टॅपिंग प्रकरणात २०२१ च्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. २०१५ ते २०१९ या कालावधीत राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा ठपका शुक्ला यांच्यावर ठेवण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button