breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमुंबईराजकारण

राष्ट्रवादीच्या मागणीने आघाडीत ‘बिघाड’?

पुणे :  पुणे शहरातील आठपैकी पैकी सहा विधानसभा मतदारासंघाची मागणी एकट्या राष्ट्रवादी काॅंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. त्यामुळे काॅंग्रेस आणि शिवसेनेने याबाबत थेट नाराजी व्यक्त केली आहे. यावर “राष्ट्रवादी काॅंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाला महाविकास आघाडी तोडायची आहे का?’ असा सवाल काॅंग्रेस पक्षाने केला आहे.

तर शिवसेनेने (ठाकरे) “शहरात जागा वाटपात समान वाटा मिळावा,’ अशी मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची ही मागणी असली, तरी जागा वाटपासून स्थानिक पातळीवर मात्र नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीची ही मागणी म्हणजे सरळ सरळ आघाडी तोडण्याची तयारी असल्याची टीका काॅग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे. प्रशांत जगताप हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत. लोकसभेत आघाडीने एकत्रपणे काम केले. त्यानंतर आता राष्ट्रवादीची भूमिका रास्त नाही. लोकसभेच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार जागा वाटप व्हावे, अशी आमची भूमिका आहे. ती आम्ही आमच्या नेत्यांकडे मांडू. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे,’ असे शिंदे यांनी म्हटले आहे.

“पुण्यात आठ जागा आहेत. त्यात शिवसेनेला समान जागा मिळाव्यात, अशी आमची आग्रही मागणी आहे. राष्ट्रवादीकडून सहा जागा मागण्याला काहीच अर्थ नाही. कसबा, कोथरूड, पर्वती, वडगावशेरीत आमच्यामुळे आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य आहे. मागील विधानसभेला राष्ट्रवादी आणि काॅग्रेस सोबत लढले होते. त्यात २ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली म्हणजे त्या जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या होतात असे नाही. आम्हीसुद्धा आघाडीत आहोत याचा विचार करून त्यांनी आघाडी धर्म पाळत जागांची मागणी करावी.” – गजानन थरकुडे, शहरप्रमुख, शिवसेना (ठाकरे)

मागील विधानसभेला काॅंग्रेसला अवघ्या काही हजार मतांसाठी पराभव पत्कारावा लागलेल्या कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघाची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून करण्यात आली आहे. आधीच कसबा मतदारसंघात काॅंग्रेसचा आमदार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला या तीन जागा काॅंग्रेस सोडणार नाही.

राष्ट्रवादी काॅंग्रेसने पर्वती, हडपसर, खडकवासला, वडगावशेरी या जागा लढल्या होत्या. त्यात जे दोन आमदार निवडून आले, ते अजित पवारांकडे आहेत. त्यामुळे आता शिवसेनाला केवळ कोथरूडचीच जागा आहे. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून शहरातील सहा जागांमध्ये प्रत्येकी दोन जागां मिळाव्यात असा शिवसेनेचा आग्रह आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button