breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

“रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपाचेच नेते…”, नवाब मलिक यांनी केला गंभीर आरोप!

मुंबई |

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षावर खळबळजनक आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपाचे बीडमधील भाजपा आमदार सुरेश धस यांच्याविरोधात १ हजार कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार दाखल केली होती. यासंदर्भातच आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी नवाब मलिक यांनी अनेक कागदपत्र सादर करत तपास यंत्रणा निष्पक्ष तपास करतील, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यात तब्बल ५१३ एकर जमिनीचा घोटाळा झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला. “आष्टी मझ्या मुस्लीम देवस्थानाच्या ३ जागा आणि हिंदू देवस्थानाच्या ७ जागा बेकायदेशीरपणे खालसा करून लाटण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंदू देवस्थानच्या ३०० एकर जमिनीचा समावेश असून मुस्लीम दर्गा आणि मशिदीच्या २१३ एकर जमिनीचा समावेश आहे. देवस्थानांच्या जमिनीचा मालकी कधीही बदलता येत नाही. पण एकूण ५१३ एकर जमिनीचा हा घोटाळा झालाय”, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

  • मंदिरांच्या जागा हडप करून हजारो कोटींचा घोटाळा?

“त्यात तिथल्या दोन नेत्यांची नावं ईडीच्या तक्रारीत आहेत. एक भाजपाचे सध्याचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नावावर तक्रार झाली आहे. जो भाजपा रामाच्या नावाने राजकारण करतो, त्याच भाजपाचे नेते प्रभू रामाच्या देवस्थानाची जागा हडप करत आहेत. विठोबाच्या नावाच्या देवस्थानाची जागा हडपत आहेत. सात मंदिरांच्या ट्रस्टच्या जागा हडप करून हजारो कोटी लाटण्याचा धंदा भाजपाकडून झाला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ईडीसारखी संस्था जिच्यावर कुणीही अविश्वास दाखवत नाही, या प्रकाराचा तपास करेल. ३ मुस्लीम आणि ७ हिंदू देवस्थानांच्या या जमिनींचा हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.

“हा प्रकार २०१७ सालापासून सुरू झाला आहे. त्या काळात उपजिल्हाधिकारी शेळके होते. त्यांनी हा उद्योग सुरू केल्यानंतर विधानसभेत यावर प्रश्न विचारले गेले. नंतर त्यांना निलंबित करण्यात आलं. नंतर प्रकाश आगाव नावाचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी २०२०पर्यंत देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार आष्टीमध्ये झाला आहे. दोन गुन्हे दाखल असताना व्यवस्थित तपास व्हायला हवा यासाठी गृहमंत्र्यांकडे तक्रार झाली. गृहमंत्र्यांनी एसआयटीची नेमणूक केली आहे”, असं देखील नवाब मलिक यावेळी म्हणाले.

  • सुरेश धस यांचं खोचक उत्तर!

या प्रकरणावरून आरोप झाल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांनी यावर खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. “काय भाषण काय बोलणं.. शोभतंय का? बोलण्याचं पिल्लू आहे का काय? थोडं हिसाबात बोला. टीका-टिप्पणी करताना उगीच दुसऱ्या अपमान करायचा असं काहीही बोलायचं. तुमचं सरकार आहे, करा चौकशा, करा तपास, उगीच ढगात गोळ्या मारण्याचं काम करू नका”, असं धस म्हणाले होते. तसेच, “मला एवढे हजार कोटी नको. मला पन्नासच कोटी द्या. माझ्या बाप-दाद्याची जी काही संपत्ती आहे, तुम्ही म्हणता मी कमावलेली आहे, ती घरादारासकट तुमच्या नावावर करून देतो. आख्खा जिल्हा सोडून जातो. पन्नास द्या. हजार कशाला?” असं देखील त्यंनी म्हटलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button