Uncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

नवरात्री उत्सव 2022 : आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व

आज घटस्थापना. इतके दिवस नवरात्रीचे वेध लागलेल्या स्त्रीवर्गातच नव्हे, तर सगळ्यांमध्येच उत्साह आणि चैतन्य खेळत असताना नवरात्रीचं आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीनं असलेलं महत्त्व महाईन्यूजच्या वतीने खास वाचकांसाठी…

पितृपक्ष संपत येतो. वातावरण किंचित तापू लागतं. हवेमध्ये अजुनही थोडा थोडा पावसाळी ओलेपणा शिल्लक असतो. शरद ऋतूची चाहुल लागते. कधीतरी उत्तररात्री उशिरा आकाशाकडे नजर टाकली तर चांदणं दिसतं. खूप सुंदर दिवस असतात ते अणि रात्री त्याहून अधिक देखण्या. मग येतो अश्विन. अश्विन शुद्ध प्रतिपदा- घटस्थापना. आपल्याकडे खूप महत्त्व असलेलं शारदीय नवरात्र.

“शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा झालीच पाहिजे, पण…” शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत
ईश तत्त्व हे स्त्री रुपात अत्यंत मोहक, रम्य वाटतं. ही देवी अयोनी संभवा आहे, भक्त वत्सला आहे, मातृरूपिणी आहे. तिच्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्द अपुरे आहेत. पण ती शस्त्रास्त्र धारण करणारीही आहे. दुष्टांचं निर्दालन करणारी आहे. शक्तीची पूजा अनादी काळापासून चालत आली आहे. जेव्हा असूर भयंकर माजले, तेव्हा ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या एकत्रित शक्तीपासून दुर्गा जन्मली. तिनं महिषासूर राक्षसाला मारून महिषासुरमर्दिनी हे नाव धारण केलं. तिच्या दिव्य अशा नऊ रूपांची पूजा या नऊ दिवसांत करतात.

स्त्रीला प्राप्त असलेली अद्भुत शक्ती म्हणजे ती गर्भ धारण करू शकते. बीज रूप असलेल्या गर्भास अन्न पाणी देऊन त्याचं पोषण करते. नवरात्रातील घट हे गर्भाचं प्रतीक आहे. सर्जनाचा हा उत्सव आहे. आदिशक्ती जगदंबा ही संपूर्ण विश्वामधली मातृ शक्ती, जननी, पालनकर्ती आहे. शरीरामध्ये वसलेल्या चक्रांवर तिची सत्ता आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत तिची नऊ स्वरूपांत पूजा होते.

प्रथम शैलपुत्री ही पर्वतकन्या असून ती वृषभावर आरूढ झालेली आहे. ही दिव्य स्वरूप असून तिच्या आराधनेमुळे सर्व रोगांचं हरण होतं.

द्वितीय ब्रह्मचारिणी ही पार्वती आहे. ती श्वेतवस्त्रा असून हातात कमंडलू व जपमाळ धारण केली आहे. ही वैराग्याचं प्रतीक आहे. स्वाधिष्ठान चक्रावर हिची सत्ता आहे.

माता चंद्रघंटा ही सुवर्ण वर्ण असून तिनं अर्धचंद्र धारण केला आहे. ती अष्टभुजा, शस्रधारिणी आहे.

चतुर्थ रूप आहे माता कुष्मांडा. जिच्या स्मित हास्यापासून ब्रह्मांड उत्पन्न झालं आहे. ही पुनरुत्पादन आणि नवनिर्मितीची देवता आहे.

पंचम रूप स्कंदमाता ही कार्तिकेय माता आहे. ही ज्ञानस्वरूप आहे. सिंहारूढ आहे.

षष्ठ रूप माता कात्यायनी. ही मातृस्वरूप आहे. स्त्रीच्या ठायी असलेली संगोपन करण्याची क्षमता हिच्या पूजनानं प्राप्त होते.

कालरात्री ही कालस्वरुपिणी असून विश्रांतीचं प्रतीक आहे. साक्षात् काल हिच्या ठायी वास करतो. हे देवीचं सातवं स्वरूप आहे. उग्र् रूप असलं तरीही शुभंकर आहे.

अष्टम रूप म्हणजे महागौरी. गौरवर्ण, मुक्त केशा अशी ही माता ज्ञान आणि शांततेचं प्रतीक आहे. ही सौम्य रूपा आहे.

आईचं नववं रूप म्हणजे सिद्धीदात्री. हिच्या पूजनानं साधकाला अष्ट सिद्धी प्राप्त होतात. तेज आणि सात्विक वृत्तीची जोपासना होते. ही कमलासना आहे. सौम्य रूप आहे.

नवरात्रीमध्ये ब्रह्मांड शक्ती ही जागृत अवस्थेत असते. या काळात स्त्रियांनी केलेली व्रत पूजा ही अतिशय फलदायी ठरते, असं म्हणतात. तसंच या दिवसांत देवीला नवविध रंगांची फुलं, वस्त्रं, आभूषणं आदी अर्पण केली जातात.

आठवड्यातील प्रत्येक वाराप्रमाणे परिधान केलेली वस्त्रं नवग्रहांच्या शुभ लहरी जागृत करतात, असं मानलं जातं. चंद्राचा रंग शुभ्र, मंगळाचा रक्त वर्ण, बुधाचा हरित, गुरूचा पिवळा, शुक्राचा गुलाबी तर शनीचा राखाडी असे रंग परिधान करावे, असं सांगतात.
महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठं आहेत. महाराष्ट्राची कुलदेवता तुळजा भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी.

हा स्त्री शक्तीचा जागर करण्याचा काल आहे .शुंभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर आदी राक्षसांना मारून आदिमाया विश्रांती घेते. या काळात जगदंबेची उपासना लोक विविध प्रकारे करतात. घटस्थापना, अखंड दीप, माला बंधन, नऊ दिवस उपवास, तसंच श्री सप्तशती पठण, नवचंडी हवन बळी, देवीचा गोंधळ, जागरण इत्यादी प्रथा-परंपरा दिसून येतात. या नऊ दिवसात कुमारिका पूजनाचं विशेष महत्त्व आहे . महानवमीला या उत्सवाचं पारणं होतं. दसऱ्याला माता सिंहारूढ होऊन सीमोल्लंघन करते आणि या उत्सवाचा समारोप होतो.

काया वाचा मने शुद्ध राहून हे नऊ दिवस अंबेचा जागर करावा. मनातील सात्विक भाव जागृत करावे आणि शरीरशुद्धी करावी. या काळात सर्वसामान्य स्त्रीच्या ठायी सुद्धा एक प्रकारचं तेज निर्माण होतं. आपली संस्कृती ही मातृपूजन करणारी आहे, स्त्रीला सन्मान देणारी आहे. स्त्रीनंसुद्धा स्वतःचं अस्तित्व, सत्व जपून दुष्ट शक्तींचा नाश करावा, हेच प्रथांचं सार मानता येईल. आई जगदंबा तिच्या सर्व भक्तांना आशीर्वचन देऊन सुख समृद्धी, तेज आणि अन्यायाशी लढण्याची शक्ती प्रदान करो, हीच तिच्या चरणी प्रार्थना. आई जगदंबेचा उदो उदो…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button