युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना कोरोनाची लागण
![Yuva Sena secretary Varun Sardesai infected with corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/802535-varun-sardesai.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, बाळासाहेब थोरात अशा बड्या नेत्यांनंतर आता युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार तसेच काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर दुसरीकडे राज्यातील बडे नेते कोरोनाबाधित होत आहेत. सध्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी चाचणी करून घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. तसेच ‘माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी’, असे आवाहन त्यांनी केले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, याआधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता युवासेनेने आपला झंझावात हा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.